
दैनिक स्थैर्य | दि. २१ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
सातार्यातील माजी सैनिकाची जादा परताव्याच्या आमिषाने ३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी करंजे (सातारा) येथील तिरूपती डेव्हलपर्स अॅन्ड शेअर ब्रोकर्स संस्थेच्या चार संचालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरूपती डेव्हलपर्स अॅन्ड शेअर ब्रोकर्स संस्थेचे संचालक अंकिता हरी शिरतोडे, मॅनेजर हरी धोंडिराम शिरतोडे, काजल रोहित विरकायदे (रा. बुधवार नाका, सातारा), अरुण अमृत घोरपडे (रा. दौलतनगर, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजू बबलू पटेल (वय ६०, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) हे माजी सैनिक असून, वरील संशयितांनी त्यांना ‘तुम्ही आमच्या संस्थेमध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याला ९ ते १० टक्क्यांनी योग्य मोबदला देऊ’, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यामुळे पटेल यांनी त्यांच्या संस्थेमध्ये थोडे थोडे करत तब्बल ३२ लाख पावती स्वरूपात गुंतवले. मोबदला म्हणून ९ लाख रुपये संबंधितांनी परत दिले; मात्र त्यानंतर पैसे देणे बंद केले. त्याबाबत विचारणा करण्यास ते गेले असता संस्थेचे मॅनेजर हरी शिरतोडे याने ‘तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो,’ अशा स्वरूपाची नोटीस वकिलामार्फत पाठवून धमकी दिली. तसेच साक्षीदार अलिशा सुरत शेख यांच्याकडून त्यांची सही असलेला १०० रुपयांचा कोरा स्टँट पेपर त्यांनी घेतला.
या प्रकारानंतर राजू पटेल यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला अधिक तपास करीत आहेत.