स्थैर्य, फलटण दि. ८: निंबळक, ता.फलटण येथील माजी सैनिक पत्नी श्रीमती प्रभावती बाबुराव ढमाळ यांनी खाजगी सावकारी विरोधात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात श्रीमती प्रभावती ढमाळ यांनी नमूद केले आहे की, श्रीमती प्रभावती ढमाळ यांना सोरायसीस हा त्वचेचा आजार असून औषधोपचारासाठी त्यांनी नवनाथ सदाशिव राणे या खाजगी सावकाराकडून दि.4 फेब्रुवारी 2014 रोजी रुपये 25 हजार, त्यांनतर सून सौ.निलम ढमाळ यांना पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याने पुन्हा औषधोचारासाठी दि.21/8/2014 रोजी 50 हजार आणि दि.2/3/2015 रोजी रानातल्या पाईललाईनच्या कामासाठी 1 लाख 35 हजार असे एकूण 2 लाख 10 हजार 10% व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने मला तुमच्याकडून 32 लाख रुपये येणे आहे असे सांगून तुमची साडे तीन एकर जमीन माझ्याकडे मुदत खरेदीने द्या असे सांगून मुदत खरेदीसाठी नेले परंतु प्रत्यक्षात शब्दात फसवणूक करुन सदरची जमीन कायम खूष खरेदीने त्याचे वडील सदाशिव अर्जून राणे यांच्या नावावर करुन घेतली. सदरची बाब लक्षात आल्यानंतर श्रीमती ढमाळ यांनी हरकत घेतली असता तुम्ही पैसे दिल्यावर जमीन परत फिरवून देतो असे नवनाथ राणे यानी सांगितले.
यानंतर श्रीमती ढमाळ व त्यांचे कुटूंबीय वारंवार नवनाथ राणे यांना रक्कम देण्यास गेल्यावर त्यानी 32 लाख रुपये परत दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही असे सांगितले. त्यानंतर श्रीमती ढमाळ यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यावर राणे याने तीन एकरापैकी दीड एकर जमीन श्रीमती ढमाळ यांच्या सुनेच्या सौ.निलम विनायक ढमाळ यांच्या नावावर फिरवून दिली. त्यानंतर वारंवार पैशासाठी नवनाथ राणे आम्हाला मारहाण करुन आमचा छळ करत असल्याचे, श्रीमती ढमाळ यांनी तक्रारीत नमूद केले आहे.