स्थैर्य, मुंबई, दि.२१: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल
ड्रग्ज प्रकरणातील चौकशीसाठी सोमवारी एनसीबी कार्यालयात पोहोचला.
तत्पूर्वी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला बुधवारी (16 डिसेंबर)
चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत त्याने तपास यंत्रणेकडे
21 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती. आज रामपाल त्याच्यासोबत काही
कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर झाला आहे. अर्जुनच्या घरातून जप्त करण्यात
आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसचे रिपोर्ट आल्यानंतर एनसीबीने त्याला
दुस-यांदा समन्स बजावले आहे. या रिपोर्टमधून काही महत्त्वाचे पुरावे
एनसीबीच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान,
एनसीबीने अभिनेत्याच्या नातेवाईकाचा हवाला देत म्हटले आहे की, अर्जुनने
दिल्लीतील डॉक्टरांकडून सीडिटेव ड्रग क्लोजेपामचे बॅकडेट प्रिस्क्रिप्शन
बनवून घेतले होते. हे प्रिस्क्रिप्शन रामपालच्या घरातून मिळाले आहे. हे औषध
केवळ डॉक्टरांच्या निर्देशानुसार वैद्यकीय दुकानातून घेतले जाऊ शकते.
एनसीबीने डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा जबाब घेतला आहे.
13 नोव्हेंबर रोजी झाली होती चौकशी
यापूर्वी
13 नोव्हेंबर रोजी तब्बल सात तास अर्जुनची चौकशी झाली होती. 13 नोव्हेंबर
रोजी झालेल्या चौकशीदरम्यान अर्जुनने एनसीबीला सहकार्य केल्याचे सांगितले
गेले होते. मात्र त्याने दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे म्हटले जाते.
म्हणून त्याला दुस-यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
त्यापुर्वी
9 नोव्हेंबर रोजी त्याच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. अर्जुनच्या
घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. या औषधावर भारतात बंदी
आहे. या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडतात. याबाबत अर्जुन रामपाल याला
खुलासा करायचा होता. 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी अर्जुनची लिव्ह इन पार्टनर
ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्सची चौकशी झाली होती. याशिवाय अर्जुनच्या कार
चालकालाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीने अर्जुनच्या घरातून काही
मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त केले होते.
दीपिकाच्या ड्रग्ज चॅटमध्ये अर्जुन रामपालच्या नावाचा उल्लेख?
गेल्या
महिन्यात दीपिका पदुकोणचे ड्रग्ज चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने तिची
चौकशी केली होती. दीपिकाच्या चॅटमध्ये ए नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. ए
अर्जुन रामपाल असू शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता.