दैनिक स्थैर्य । दि. 30 एप्रिल 2022 । फलटण । “फलटण शहर व तालुक्यात परंपरेप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा होत असतो. महापुरुषांना अभिवादन करताना राजकारण विरहीत, गट – तट, जात – पात बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक असते. याच भावनेतून या भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवात फलटण शहर व तालुकावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे”, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला फलटणला शहर व तालुक्यात साजरी करण्याची परंपरा आहे. यंदा हा शिवजयंतीचा उत्सव सोमवार, दिनांक 2 मे 2022 रोजी संपन्न होणार असून या शिवजयंती उत्सवाची माहिती देण्यासाठी येथील ‘लक्ष्मीविलास’ पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, “ फलटणचे माजी नगराध्यक्ष स्व.नंदकुमार भोईटे यांच्या पुढाकारातून यापूर्वी अशी एकत्रित शिवजयंती साजरी करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे या उत्सवाला खंड पडला. तीच परंपरा पुढे सुरु ठेवून फलटण शहर व तालुक्यातील सर्व सार्वजनिक मंडळे, कार्यकर्ते व नागरिकांना एकत्रित घेवून शिवजयंती साजरी व्हावी व एकीचा संदेश सर्वत्र जावा यासाठी आपला प्रयत्न आहे. शिवजयंतीदिनी सकाळी 9:00 वाजता शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये युवक व युवती सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसर येथून छत्रपती शिवरायांच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक पोवाडा, गझी नृत्य, सनई, चौघडे, संबळ, लेझीम, तुतारी अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात विविध चित्ररथांसह निघणार आहे. महात्मा फुले चौक, गजानन चौक, शंकर मार्केट, शुक्रवार पेठ, उंब्रेश्वर चौक (मलठण), पाचबत्ती चौक, बारामती चौक या मार्गाने मिरवणूकीचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होईल.”
“फलटण शहरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असावे अशी मागणी फलटणकरांची होती. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन परिसरात होणार्या या नियोजित स्मारकामध्ये बसवण्यात येणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे या मिरवणूकीच्या निमित्ताने फलटण शहरात आगमन होणार आहे,” असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
“मोती चौक शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दि.1 मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री 8 वाजता प्रा.नितिन बानगुडे – पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानानंतर रात्री 12:00 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक होणार आहे, असे सांगून फलटण शहर व तालुक्यातील सर्व मंडळांनी आपापल्या गावात, चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन फलटण शहरात आयोजित केलेल्या भव्य मिरवणूकीमध्ये सामील व्हावे आणि एकीचा संदेश द्यावा”, असेही आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.