वारकऱ्यांची कसलीच गैरसोय होणार नाही, याची सर्वानी दक्षता घावी; आषाढीवारी पालखी सोहळ्याचे नियोजन बैठक संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । लोणंद । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अवघ्या काही आठवड्यावर येउन ठेपलेला असताना लोणंद नगरपंचायतीची अजूनही पुर्वतयारी झालेली नसल्याबद्दल नुकतेच पालखी सोहळा विश्वस्तांकडून असमाधान व्यक्त केले गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर वाई प्रताधिकारी राजेंद्र जाधव यांनी आढावा बैठक घेऊन पालखी सोहळ्याचे चोख नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या.

लोणंद नगरपंचायत सभागृहात प्रांताधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सर्व विभाग प्रमुख तसेच नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके , गणीभाई कच्छी, रविंद्र क्षीरसागर, सचिन शेळके, सागर शेळके, विरोधी पक्षनेत्या दिपाली निलेश शेळके, ज्योतीताई डोनिकर, प्रवीण व्हावळ, भरत बोडरे, भरत शेळके महावितरणचे अभियंता सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, असगर इनामदार, बंटी खरात, सागर गालिंदे, निलेश शेळके, अनिल कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी होणारा पालखी सोहळा कोविड मुळे दोन वर्षांच्या खंडानंतर होत असल्याने यंदाच्या वारीत वारकरी मोठ्या संख्येत उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्याने लोणंद येथील दिनांक २८ व २९ असा अडीच दिवसाचा मुक्काम आहे. त्यामध्ये वारकऱ्यांची कसलीच गैरसोय होणार नाही, यासाठी सर्वांनी सजग राहण्याबाबत प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सुचना दिल्या तसेच याकाळात वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा पुरवण्याबाबत तसेच पालखी तळावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

याचबरोबर पालखी तळावरील सपाटीकरण, वारकऱ्यांसाठी स्नानगृह, दर्शन रांगा, विजेची सोय करणे, मोबाईल टॉयलेटचे नियोजन करणे, गावातील काटेरी झाडे- झुडपे काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करणे, लोणंद शहरातील पालखी मार्गावरील खड्डे बुजविणे, पाणी पुरवठा टँकर नियोजन,दर्शन रांगेचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!