दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । सातारा । भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत रहाव्यात, या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात क्रांतीकारकांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी यासाठी ” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ” 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येकांच्या घरावर, शासकीय कार्यालयांवर तिरंगा झंडा फडकेल, या हर घर झंडा उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवा निमित्त ‘ हर घर झंडा ‘ उपक्रम राबविण्याबाबतच्या तयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, स्वयंसेवी संस्था यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कार्यालयांवर तिरंगा झंडा लावण्याबरोबर ध्वजसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक नागरिकांच्या घरावर तिरंगा झंडा लावण्यासाठी त्यांच्या मध्ये जागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
हर घर झंडा उपक्रम असा असणार आहे
हर घर झंडा अभियानासाठी जिल्हा परिषद समन्वय संस्था असणार आहे. दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर तिरंगा झंडा स्वयंस्फूर्तीने फडकविणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जन जागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.
प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व सर्व वाचनालयांवर हर घर झंडा उपक्रमांतर्गत 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत तिरंगा झंडा फडकेल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वयाने काम करा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी सांगितले.