
दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२३ | फलटण |
फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी गुरुवारी अधिवेशनात सातारा जिल्ह्यात डोंगरी भागासह बिगर डोंगरी भागातही साकव घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यास संबंधित मंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
आ. दीपक चव्हाण यांनी राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात बिगर डोंगरी भागातही साकव घ्यावेत, अशी मागणी केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, माझा प्रश्न स्कोपच्या बाहेर असला तरी महत्त्वाचा आहे. शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे की, डोंगरी भागामध्ये साकव करण्यात यावेत. मात्र, डोंगरी भागात जसे ओढे-नाले असतात, तसेच ते बिगर डोंगरातही ओढे-नाले असतात. तेथील लोकांच्याही गरजा असतात. त्यामुळे त्यांना साकव पुलांची मोठी आवश्यकता भासते. म्हणून शासनाने डोंगरी भागासह बिगर डोंगरी भागातही साकव करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. या मागणीला उत्तर देताना बांधकाम मंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.