दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । यवतमाळ । राज्यातील शेतकऱ्यांवर पुराचे संकट आले आहे. अजूनही अनेक भागातील शेती पाण्याखाली आहे. शेतात जाता येत नाही, गेल्या 18 दिवसापासून ही स्थिती आहे. असे असताना राज्याचे दोन सत्ताधारी प्रमुख शेतकर्यांना वाऱ्यावर सोडून दिल्लीवारी करीत असल्याची टिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार केली. ते शुक्रवार (ता 29) पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हादौर्यावर आले असतांना विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, इंद्रनिल नाईक उपस्थित होते. पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की, 28 वर्षानंतर पाउस आणि पुराचे संकट आले आहे. शेतकर्यांचा खरीप हंगाम हातातून गेला. अशा परिस्थितीमुळे शेतकरी मदतीसाठी टाहो फोडतो आहे. अडचणीच्या काळात राज्य शासनाने तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक आहे.
असे असताना राज्यात एकही मंत्री नाही, शेतकर्यांनी मदत मागायची कुणाकडे असा प्रश्न श्री पवार यांनी उपस्थित केला. राज्यात दोघांचाच कारभार सुरू आहे. अजूनही ते नुकसान झालेल्या भागात पोहोचलेले नाही. जिल्हयाची ठिकाणी केवळ बैठक घेतल्याचा आरोप पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांचेवर केला. जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाही. शेतकर्यांची जनावरे दगावली त्यानांही मदत करण्यात शासनाने आखडता हात घेतला आहे. शेतकर्यांवर आलेल्या या अभूतपूर्व संकटात एनडीआरएफच चे निकष बाजूला ठेवून विशेष बाब म्हणून शेतकर्यांना पॅकेज जाहीर करणे गरजेचे असल्याचेही विरोधी पक्षनेते अजीत पवार म्हणाले.
माझ्या कामात नाक खुपसू नका
विदर्भातील शेतकर्यांवर मोठे संकट आले आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आताच का गेले? असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्यांनी त्यांचे काम करीत शेतकर्यांना मदत करावी. मी कधी जावे हा माझा विषय आहे, उगीच मध्ये मध्ये कुणी नाक खुपसू नये अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
उपमुख्यमंत्र्यांनकडे कोणती खाती त्यांनी जाहीर करावे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीत पाचच मंत्री असल्याची टीका केली होती. यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की आमचे पाच नाही सात मंत्री होते. सर्वाना खातेवाटप झाले होते. सध्या राज्यात दोघेजण आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनकडे कोणती खाती आहे, हे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना केले.
कर्जमाफीशिवाय पर्याय नाही
शेतकर्यांवर आलेले संकट मोठे आहे. पीक निघण्याआधीच गेले. शेतकर्यांनी पीककर्ज घेऊन दुबार पेरणी केली. शेतात पीकच नसल्याने त्यांच्या समोर पीककर्ज फेडण्याचा यक्षप्रश्न आहे. शेतकर्यांना हिमंत देण्यासाठी कर्जमाफी शिवाय पर्याय नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.