स्वतःची १२५ हेक्टर जमीन मोफत देवून पाडेगाव ऊस संशोधन व बियाणे उत्पादन केंद्राची उभारणी

श्रीमंत मालोजीराजे शेती व शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देणारा राजा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी संस्थानातील रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने शेती व शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पाडेगाव, ता. फलटण येथे स्वतःची १२५.५१ हेक्टर जमीन देवून त्यावर ऊस संशोधन व ऊस बियाणे निर्मिती केंद्र स्थापन केले व शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडविली. रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी दिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या कृषी व सहकार क्षेत्रातील कार्याचा घेतलेला आढावा…

सन १२८४ पासून अस्तित्वात असलेल्या फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी फलटण संस्थानमधील कायम दुष्काळप्रवण प्रदेशातील जमिनींना पाटाचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी सन १९२७ मध्ये निर्माण झालेल्या भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी फलटण संस्थानातील अनेक गावांना मिळवून दिले. त्यामुळे संस्थानातील २५ टक्के पेक्षा अधिक शेतजमिनी बागायती बनल्या व फलटण संस्थानामध्ये ऊस शेतीचे क्षेत्र वाढू लागले. त्या ऊस शेतीस चांगले बियाणे पुरविण्याच्या हेतूने पाडेगाव येथील स्वतःच्या १२५.५१ हेक्टर क्षेत्रावर ऊस बियाणे उत्पादन केंद्र फलटण संस्थानांतर्गत सुरू केले व शेतकर्‍यांना दर्जेदार ऊस बियाणे उपलब्ध करून देवून अधिक क्षेत्रावर ऊस शेती करण्याचे आवाहन केले.

उपलब्ध उसाचे गाळप व शेतकर्‍यांना अधिकचे चार पैसे मिळण्यासाठी त्यांनी श्रीमान शेठ मफतलाल व लक्ष्मणराव आपटे यांच्याशी वाटाघाटी करून व सवलत देऊन, मदत करून सन १९३३ साली आपल्या संस्थानात साखरवाडी येथे फलटण शुगर वर्क्स लिमिटेड या नावाचा साखर कारखाना उभा केला. त्यानंतर १९५४ साली श्रीराम सहकारी साखर कारखाना, नंतर माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व इतर सहकारी साखर कारखाने काढण्यासदेखील श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी मदत केली. सोमेश्वर कारखान्याचे ते स्वतः संस्थापक चेअरमन होते.

साहजिकच सहकारी व खाजगी साखर कारखाने उभे राहिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना उसाला समाधानकारक दर मिळू लागला, परिणामी ऊस लागवडी आणि अधिक ऊस ऊत्पादनास प्राधान्य मिळू लागले.

भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे ऊस उत्पादनामध्ये अग्रेसर असल्यामुळे ऊस पिकावर विविध प्रकारचे संशोधन करून अधिक उत्पादन देणारे उसाचे वाण निर्माण करण्यासाठी सन १८९० मध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, मांजरी येथे स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर या ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्यासाठी व चांगले वाण निर्मितीसाठी सन १९३२ मध्ये ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे स्थलांतरीत करण्यात आले. सातारा प्रांतातील फलटणचे तत्कालिन अधिपती श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी पाडेगाव येथे १२५.५१ हेक्टर जमीन ऊस संशोधन केंद्रास दिली होती. त्या क्षेत्रावर आजही हे ऊस संशोधन व अधिक उत्पादन देणारे वाण निर्मिती केंद्र म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून उत्तमप्रकारे कार्यान्वित आहे.

फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर राजेसाहेब यांनी दूरदृष्टीने या जिरायती पट्ट्यात पाटाचे पाणी, पाडेगाव ऊस संशोधन व बियाणे उत्पादन केंद्र आणि साखर कारखानदारी उभी केल्याने आज हा संपूर्ण पट्टा किंबहुना नीरा खोरे सुजलाम सुफलाम झाले आहे.

१२५.५१ हेक्टर क्षेत्रावर उभे राहिलेले मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचा लाभ केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला होत आहे, असे उल्लेखनिय कार्य श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी केले आहे.

श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास दि. २७ जुलै १९५२ रोजीच्या फेरफार नंबर १९२६ नुसार सदर जमीन फलटण सरकारने मुंबई राज्य सरकारला दिली तर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर राज्य शासनाच्या शेती खात्याने सदर जमीन पाडेगाव फार्मच्या नावे केल्याचे महसुली कागद पत्रावरून स्पष्ट होते.

श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी आपल्या संस्थानातील रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला, त्याचाच एक भाग म्हणून पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, ऊस उत्पादनाला प्रोत्साहन आणि ऊस गाळपासाठी सहकारी व खाजगी साखर कारखानदारीची उभारणी केली, त्याबरोबर आपल्या संस्थानात सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. संस्थानात सहकारी पतपेढी व सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. १९१८ साली दि फलटण बँक लिमिटेडची स्थापना करण्यात आली, तसेच १९२६ साली श्री लक्ष्मी सेंट्रल को – ऑप. बँक स्थापन केली. सहकारी संस्थांमुळे संस्थानातील शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक यांना पतपुरवठा होऊ लागला, समृध्दी वाढली.


Back to top button
Don`t copy text!