उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२४ | सातारा |
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे व तसेच सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये येथे उष्माघातावरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली आहे.

कोणत्या गोष्टी कराव्यात
दिवसातून गरजेनुसार २ ते ३ लिटरपर्यंत भरपूर पाणी प्यावे. लिंबूपाणी, ताक, लस्सी, आंब्याचे पन्हे व कोकम सरबत अशा घरगुती शीतपेयांचा भरपूर वापर करावा. टरबूज, खरबूज, कलिंगड, संत्री, द्राक्षे, काकडी यासारखे उच्च पाण्याचे प्रमाण असलेल्या फळांचा वापर करावा. तुमचे घर थंड ठेवा, पडदे, सनशेड, शटरचा वापर करावा. आवश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर जाताना सैल, सुती कपड्यांचा वापर करावा. तसेच उन्हामध्ये जाताना छत्री, टोपी, रूमाल याचा वापर करावा. घराबाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली बाळगावी. शक्यतो दैनंदीन कामे ही सकाळी लवकर किंवा उन्ह कमी झाल्यानंतर सायंकाळी करावीत.

कोणत्या गोष्टी टाळाव्यात
शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये. दुपारच्या वेळेस अति परिश्रमाची कामे टाळावीत. कार्बोनेटेड शीतपेय, चहा, कॉफी तसेच अतिप्रमाणात साखर असलेले पदार्थ टाळावेत. आजारी व्यक्तीने (दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा दीर्घ आजाराने ग्रस्त) उन्हामध्ये घराबाहेर पडू नये.

उष्माघाताची लक्षणे
उन्हामध्ये जास्त काळ काम केल्यास शरीराचे तापमान वाढू लागते व काही जणांमध्ये शरीराचे तापमान ४०°C (१०४° F) पर्यत पोहचते. अशावेळीस शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात व खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात.

  • चक्कर येणे
  • उलट्या मळमळ होणे
  • डोके दुखणे
  • अति तहान लागणे
  • हृदयाचे ठोके वाढणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • चिडचिड होणे
  • त्वचा लाल व कोरडी होणे
  • बेशुध्द होणे

वरील लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीस लवकरात लवकर थंड व हवेशीर वातावरणात घेऊन जाऊन ताबडतोब नजीकच्या दवाखान्यात घेऊन जावे, असे आवाहनही डॉ. करपे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!