सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासकीय समिती स्थापन करा : विक्रम ढोणे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी भुमीपूजनापु्र्वी अध्यासन केंद्रासाठी 18 कोटींचा निधी मंजूर करावा  

स्थैर्य, सोलापूर, दि. २० : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासकीय निधीची तरतूद करण्याची भुमिका राज्य शासनाने घेतली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आता हे स्मारक साकारण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या धर्तीवर शासकीय समिती स्थापन करावी, अशी मागणी धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

यासंबंधीचे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी अहिल्यादेवींचे स्मारक हे जाणीवपुर्वक लोकवर्गणीतून करण्याचा घाट घातला होता. यापार्श्वभुमीवर अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीदिवशी (13 ऑगस्ट) धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्री, तसेच सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अहिल्यादेवी स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. कुलगुरू मृणालिनी फडणवीस या अहिल्यादेवींना एका जातीत बंदीस्त करत असून त्या मन मानेल तसे निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त निर्णयांची चौकशी करण्याची मागणीही ढोणे यांनी केली होती. 

यासंदर्भाने बुधवारी मुंबईत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत स्मारकासाठी भरीव निधी देण्याचे जाहीर करण्यात आले, तसेच ऑक्टोंबर महिन्यात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्मारकाचे भुमीपूजन करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या निर्णय़ाचे स्वागत करून ढोणे यांनी मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 

राज्य शासन भरीव निधी देणार असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले आहे मात्र नेमका निधी स्पष्ट केलेला नाही. अहिल्यादेवी स्मारक आणि अहिल्यादेवी अध्यासन या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. स्मारकासाठी विद्यापीठाने सुमारे अडीच कोटी मागितले आहेत, असे आम्हाला समजले आहे. पण हा निधी पुरेसा आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. कुलगुरू फडणवीस यांनी स्मारकासंबंधीची प्रक्रिया घाईगडबडीत केलेली आहे. त्यामुळे स्मारकाचा आराख़डा आणि तरतुदीचा विचार नव्याने करणे आवश्यक आहे. गरजेनुसार वाढीव तरतूद करावी. तसेच अहिल्यादेवी अध्यासनासाठी सुमारे 18 कोटींचा प्रस्ताव आहे. त्याला मंजूरी मिळावी. सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक आणि भौगोलिक विकासाच्या अनेक बाबी तातडीने होणे आवश्यक आहेत. अहिल्यादेवींच्या नावाला साजेसे स्मारक करण्याबरोबरच विद्यापीठातील शिक्षणही त्या दर्जाचे झाले पाहिजे. विद्यापीठात सर्व विद्याशाखांचे विभाग सुरू व्हावेत.मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी भुमीपूजनाला येण्यापुर्वी अध्यासानाचा 18 कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. 

यापुर्वी कुलगुरू फडणवीस यांनी वादग्रस्त व्यक्तींना घेवून स्मारक समिती बनवली आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असे नमूद करून ढोणे यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवींचे स्मारक साकारण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात पुतळा उभा करताना अशी समिती करण्यात आली होती. त्याप्रमाणे निर्णय व्हावा. त्यामुळे अल्पावधीत स्मारकाचे काम मार्गी लागेल. हे स्मारक करीत असताना त्यात राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा करू नये. या समितीत मंत्री, शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, इतिहासाचे अभ्यासक, वास्तूरचनाकार असावेत, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. 

कुलगुरूंच्या हेतूविषयी शंका

राज्य शासनाने कालच्या एका बैठकीत स्मारकाचा विषय मार्गी लावला. तसेच भुमीपूजनाची संभाव्य तारीखही जाहीर केली. यापार्श्वभुमीवर कुलगुरू फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी यापुर्वी स्मारकाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला होता का, त्याचा पाठपुरावा केला का, हे जनतेला समजणे आवश्यक आहे. लॉकडाऊनची पॅनिक परिस्थिती असताना फडणवीस लोकवर्गणीसाठी खाते उघडण्याची घाई करताना दिसल्या. समिती स्थापन करताना त्यांनी सुरवातीला सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा अदखलपात्र समजले. नंतरच्या टप्प्यात त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना समितीत घेतले. फडणवीस या राज्य शासनाला बाजूला ठेवून स्मारकाचे काम कां करू इच्छित होत्या, हेही समोर आले पाहिजे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!