सातार्‍यात ईएसआय हॉस्पिटल तातडीने उभारावे

खासदार उदयनराजेंनी घेतली ना. मनसुख मांडविया यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। सातारा । सातारच्या एमआयडीसीमध्ये मंजूर असलेल्या ईएसआय हॉस्पिटलची उभारणी तातडीने सुरू करावी. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात अ‍ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक आणि इनडोअर बास्केटबॉल कोर्ट तयार करावे. सातार्यामध्ये आर्चरीसाठी मैदान आणि अन्य सुविधा निर्माण कराव्यात आदी मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत केंद्रीय क्रीडा, कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केल्या.

या निवेदनात म्हटले आहे की, सातारर्‍यासाठी स्वतंत्र ईएसआय हॉस्पिटल 2024 मध्ये मंजूर करण्यात आले असून, एमआयडीसीतील शासकीय दुग्ध योजनेची जागा एक रुपया प्रति स्क्वेअर फूट याप्रमाणे देण्याचा निर्णय झाला आहे. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी प्राधान्याने डीपीआर तयार करणे, व्यवस्थापन नियुक्त करणे आणि निधी देणे आवश्यक आहे. सातारा येथील 3200 आस्थापनांमधील हजारो कर्मचारी ईएसआय योजनेचे सदस्य आहेत. या योजनेशी संबंधित कामांसाठी त्यांना कोल्हापूर येथे ईपीफ ऑफिसमध्ये जावे लागते.

छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात अ‍ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक नसल्याने, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडवण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे येथे खेलो इंडियाच्या माध्यमातून सिंथेटिक ट्रॅक करावा.

बास्केटबॉलसाठी इनडोअर कोर्ट निर्माण करावे. सातार्‍याने अनेक बास्केटबॉलपटू घडवले असून, जिल्हा क्रीडा संकुलात इनडोअर बास्केटबॉल कोर्ट तयार करावे. जिल्ह्यात आर्चरीचा प्रसार होत आहे. अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळवले आहे. त्यामुळे सातार्यात आर्चरीसाठी मैदान आणि इतर सुविधा निर्माण कराव्यात. दरम्यान, या मागण्यांना ना. मांडविया यांनी सकरात्मक प्रतिसाद दिला.


Back to top button
Don`t copy text!