दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
माण-खटावमध्ये १५ ठिकाणी २५००० झाडांचं वृक्षारोपण करून रक्षितावनाची निर्मिती करून जलसंधारण, वनसंधारण, निसर्ग रक्षणाचे जनजागृतीचे कार्य हाती घेत दुष्काळी भागातील परिस्थिती बदलण्याचा पर्यावरणहित रक्षिता फौंडेशन प्रयत्न करत आहे.
सातारा जिल्हा हा दोन भिन्न भौगोलिक परिस्थितीने तयार झालेला आहे. एका बाजूला सह्याद्रीच्या उंचच्या उंच पर्वतरांगा, मोठमोठाली जंगलं, सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, बारमाही वाहणार्या पाच नद्यांचा उगम, थंड हवेचे ठिकाण असं नैसर्गिक ऐश्वर्य लाभलेला पृथ्वीतलावरील जणू स्वर्गच अवतरलेला आहे.
तर दुसरीकडे सातारा जिल्ह्याच्या पूर्वीकडील भागात कमी पर्जन्यमान, कोरड्याठाक तळ गाठलेल्या विहिरी, आठलेले तलाव, वर्षातून एखाद्या, दुसर्या दिवशीच वाहणारी माणगंगा नदी अशा दुष्काळी परिस्थितीत जिवंतपणे नरकयातना भोगणारा माणदेशी भाग आहे.
महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमानाची नोंद असलेला भाग म्हणून आमच्या माणदेशाची ओळख आहे. दूर दूरपर्यंत ओसाड, उजाड, दगडधोंड्यांची माळरानं नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, काटेरी-खुरट्या झाडांनी व्यापलेल्या डोंगररांगा, कमी पाऊसमान व सततचे ओढवलेले मानवनिर्मित आस्मानी संकट अशा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम आमच्या माणदेशी भागातील जनजीवनावर झालेला आहे. हा परिणाम मुख्यत्वे सर्व कष्टकरी, बळीराजा, पशुधनावर मोठ्या प्रमाणावर होतो. निसर्ग, वन्यजीव, पशुपक्षी यांच्या थेट उपजीविकेवर होतो. अशा गंभीर समस्यांना माणदेशाला वारंवार तोंड द्यावे लागत आहे.
माणदेशीवासियांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे म्हणून गेल्या सात वर्षांपूर्वी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या गावापासून जवळच असलेल्या ओसाड माळरानावर पर्यावरण रक्षण व दुष्काळ मुक्तीसाठी छोटेसे पाऊल उचलले गेले. येथे जलसंधारण व वनसंधारण करण्याचे कार्य ‘पर्यावरणहित रक्षिता फौंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. माणदेशात वेगवेगळ्या १५ ठिकाणी २५००० झाडांचं वृक्षारोपण करून रक्षितावनाची निर्मिती या फाऊंडेशनने केली आहे.
माणदेशी दुष्काळी भागातून लुप्त होत चाललेल्या वड, पिंपळ या प्रजातीच्या झाडांचे तसेच दुर्मिळ आयुर्वेदिक वनऔषधी सुगंधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे संवर्धन करणे ही संस्था करीत आहे.
माणदेशाची दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी जलसंधारण व वनसंधारण, निसर्गरक्षण जनजागृतीचे कार्य हाती घेऊन पर्यावरणहित रक्षिता फौंडेशन प्रयत्न करत आहे. फाऊंडेशनचे हे प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत.