सायकल वारीतून पर्यावरण अन् आरोग्याचा जागर


दैनिक स्थैर्य । 26 जून 2025 । सातारा । सायकल प्रेमी फाउंडेशन, कोरेगाव यांच्यावतीने आयोजित कोरेगाव ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात पार पडली. 20 जून रोजी हणमंत ढवळे, नंदकुमार डोईफोडे व नितीन पिसाळ यांनी तीर्थक्षेत्र दक्षिणकाशी महागणपती मंदिराचे दर्शन घेऊन वारीस प्रारंभ केला. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीचे जनक हैबतबाबा यांच्या जन्मभूमी आरफळ येथे जाऊन हैबतबाबांचे दर्शन घेतले.

वारीचा पहिला मुक्काम कोरेगाव येथे झाला. 21 जून रोजी सकाळी सरस्वती हायस्कूल, कोरेगाव येथून सायकल रिंगण करून वारीला शुभारंभ करण्यात आला. ही वारी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार
करणारी असून, रस्त्यालगतच्या शाळांना झाडे वितरित करण्यात आली.

वारी दरम्यान विविध शाळांनी जल्लोषात सहभाग घेतला. वर्धनगड येथील जिल्हा परिषद शाळा, वर्धनी हायस्कूल, गुरुकुल आश्रम, महात्मा फुले हायस्कूल, कडगुन हनुमानगिरी हायस्कूल निढळ व न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड येथील विद्याथ्यांनी ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात सायकल वारीचे स्वागत केले.

यावेळी गरवारे टेक्निकल फायबर कंपनी यांच्यावतीने पर्यावरणपूरक कापडी पिशव्या आणि झाडांच्या बिया देण्यात आल्या. यानंतर गोंदवलेकर महाराजांचे दर्शन, म्हसवड येथे दुपारचे जेवण, भजन, विश्रांती घेतली आणि पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. वाखरी येथे रिंगण पूर्ण करून पंढरपूरमध्ये प्रवेश करत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन भक्तिनिवासात मुक्काम झाला.

22 जून रोजी सकाळी अखिल महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सायकल रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. युवा क्रीडा व राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत 5 हजार सायकलपटूंनी भक्तिमय वातावरणात नगरप्रदक्षिणा व रिंगण पूर्ण केले. कोरेगावहून तब्बल 80 सायकलपटूनी सहभाग घेतला होता, सायकलप्रेमी फाउंडेशनतर्फे सुसज्ज नियोजन व व्यवस्थापन करण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!