उद्योजक राम निंबाळकर यांचा एकसष्टी गौरव सोहोळा मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी निंबळक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय…
निंबळक सारख्या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राम निंबाळकर यांनी सिव्हील इंजिनियर पदवी प्राप्त केल्यानंतर वडिलांनी थोडे भांडवल देवून स्वतःचा व्यवसाय करण्याची सूचना केल्यानंतर राम निंबाळकर यांनी पुण्यात जाऊन अवघ्या ३०/४० वर्षात उभे केलेले साम्राज्य आणि वैभव त्यातून अनेकांना दिलेली रोजगाराची संधी हे घराण्याची परंपरा आणि कुटुंबाच्या संस्काराचे फलित असल्याचे मान्यच करावे लागेल.
वडीलांच्या शेती व अन्य व्यवसायात न रमता त्यांनी माध्यमिक शिक्षणानंतर थेट बेळगावात जाऊन डिग्री प्राप्त केली आणि डिग्री मिळताच वडील स्व. उदयसिंह निंबाळकर यांच्या सूचनेनुसार त्यांचाच आदर्श घेऊन राम निंबाळकर पुण्यात पोहोचले, कसलीही माहिती नाही, मार्गदर्शनासाठी त्या क्षेत्रातील कोणाचा पाठिंबा नाही अशा परिस्थितीत पुण्यात एका मित्रासमवेत भागीदारी फर्म उभी करुन व्यवसायाला सुरुवात केली आणि या क्षेत्रात स्वतः मिळविलेला नाव लौकीक आणि जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा यांच्या बळावर आई – वडिलांचे आशिर्वादाने राम निंबाळकर यांनी राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या रुपाने स्वतः चे एक वेगळे विश्व निर्माण केले आहे.
बिनचूक, दर्जेदार आणि वेळेवर काम करण्याला प्राधान्य देण्याच्या राम निंबाळकर यांच्या काम काज पद्धतीमुळे राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या कंपनीने आपल्या क्षेत्रात नावलौकिक तर मिळविलाच पण आपला वेगळा आदर्श निर्माण करुन वेळेवर आणि दर्जेदार काम म्हणजे राम निंबाळकर हे सूत्र प्रचलित केले आहे.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गापैकी शिर्डीपर्यंतच्या सुमारे ३०/३५ कि. मी. अंतरामधील रस्त्यांच्या कामांसह गोदावरी नदीवरील मोठा पूल आणि रेल्वे ओव्हर ब्रीजसह या मार्गावरील अन्य छोट्या-मोठ्या पुलांची कामे बिनचूक, वेळेवर आणि दर्जेदार केल्याबद्दल ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट सन्मानपूर्वक प्रदान करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे राम निंबाळकर यांचा विशेष गौरव केला आहे.
राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने मोठ्या विश्वासाने कंपनीवर सोपविलेली जबाबदारी अत्यंत कौशल्याने वेळेत पूर्ण केल्याचे नमूद करताना या कंपनीच्या पूर्वीच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊनच त्यांना ही जबाबदारी देण्यात आली, ती त्यांनी वेळेत पूर्ण केल्याचे नमूद करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे राम निंबाळकर यांचे त्यावेळी अभिनंदन केले आहे.
राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने आतापर्यंत स्वीकारलेले रस्ते, पूल व तत्सम कामे आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातून स्वीकारलेली कालव्याची कामे नेहमीच दर्जेदार व वेळेत पूर्ण करुन आपला नावलौकिक कायम जपला असून त्यामागे राज़ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक राम निंबाळकर यांचा व्यवसायातील प्रामाणिकपणा जपण्याचे धोरण उपयुक्त ठरल्याचे मान्य करावे लागत असल्याचे गौरवोद्गार तर नेहमीच व्यक्त होत असतात.
राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रचंड व्याप सांभाळताना कुटुंबाची जबाबदारी, घरची शेती आणि शेती महामंडळाकडून खंडाने घेतलेली सुमारे २०० एकर शेती ही संपूर्ण जबाबदारी अत्यंत कुशलतेने सांभाळताना या वयातही राम निंबाळकर कधी थकलेले किंवा कोणावर रागावलेले पहायला मिळाले नाहीत, तर सतत हसत मुखाने सर्वांना जबाबदारी समजावून देवून ती पूर्ण करुन घेण्यात राम निंबाळकर यशस्वी झाले आहेत. त्यातच गेल्या २०/२५ वर्षात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु ठेवून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यात ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी/सदस्य यशस्वी झाले आहेत.
उद्योग व्यवसाया निमित्त पुण्यात वास्तव्य असले तरी निंबळक पंचक्रोशी आणि ग्रामस्थांशी असलेली आपली नाळ कायम ठेवत त्यांनी येथे उत्तम संपर्क ठेवला आहे, अलीकडे निंबळक येथे प्रशस्त निवासस्थान इमारत उभारुन आपण इथले वास्तव्य व संपर्क जपत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आई – वडिलांचे छत्र अलीकडे हरपल्याने ती एक मोठी पोकळी त्यांच्या जीवनात निर्माण झाली आहे, पण त्यांचे आदर्श आणि विचार घेऊन त्यांनी पुन्हा नव्या जोमाने वाटचाल सुरु केली असून त्यामध्ये पत्नी आणि सुपुत्र चि. अधिराज यांची उत्तम साथ त्यांना लाभत आहे.
एकसष्टी साजरी होत असताना त्यांना लाभलेले उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, सुख समाधान आणि ग्रामस्थांची सक्रिय साथ सतत वाढत राहो, ही निमजाई चरणी विनम्र प्रार्थना !
– संजय कापसे, निंबळक.