डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने समृद्ध केले – कुंदा लोखंडे – कांबळे


स्थैर्य, सातारा, दि. 7 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मला प्रेरित आणि समृद्ध केले.समाज बदलासाठी सकारात्मक साहित्याची व सांस्कृतिक हस्तक्षेपाची गरज आहे,असे मत कवयित्री लेखिका कुंदा लोखंडे -कांबळे यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ’मी आणि माझे लेखन’ या विषय सूत्रावर आयोजित करण्यात आलेल्या 39व्या वर्षातील थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे होते. विचारमंचावर उपाध्यक्ष प्रा.प्रशांत साळवे, सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव व डॉ.जयपाल सावंत उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे संचित बालपणापासून मिळाले. त्यामुळे मला स्वातंत्र्य,समता, बंधुता, मानवतावादाची मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन व समाजाकडे बघण्याची सकारात्मक जाणीव झाली. ती समाजामध्ये रुजवण्यासाठी मी लेखन व ग्रामीण भागात समाज प्रबोधन केले. साहित्याचा दूरगामी परिणाम होतो हे मी माझ्या लेखनाद्वारे अनुभवले.
रात्री अपरात्री कशालाही न घाबरता शेतात राबणार्‍या स्त्रिया माणसातील भुताला त्यांच्या विकृत वासनांना घाबरतात. हे भयानक समाज वास्तव आहे. विधवा स्त्रियांना समाजात सन्मान दिला जात नाही. आई- आज्जी हळदीकुंकू समारंभ मेळावे घेऊन तो सन्मान देण्यासाठी मी प्रबोधनात्मक उपक्रम राबविले . विज्ञाननिष्ठ मुले घडवली. ऊसतोड व वीटभट्टी कामगारांच्या शालाबाह्य मुलांच्या प्रश्नांचे भीषण वास्तव संवेदनशील लेखकाला शिक्षकालाअस्वस्थ करणारे आहे. त्यांचे दुःखमय जीवनाला साथ देत आलेल्या अनुभवाच्या कथा लिहिल्या. मुले घडवली याचे समाधान आहे. ग्रामीण परिसरातील म्हणींचे अनमोल धन आणि अस्सल शिव्या मराठी साहित्य व भाषेला समृद्ध करतात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश इंजे यांनी केले. डॉ. सुवर्णा यादव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. जयपाल सावंत यांनी आभार मानले. संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, मायणीच्या निवृत्त शिक्षिका प्रतिभा इनामदार तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त व विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!