प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकिकात भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद  प्रभू, लीना प्रभूराजू रावल तसेच संकुलाचे पदाधिकारी यांच्यासह, प्रशिक्षक, क्रीडापटू उपस्थित होते. प्रारंभी डॉ. रमेश प्रभू यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

 मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, डॉ.रमेश प्रभू हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच या क्रीडा संकुलाची उभारणी केली. या क्रीडा संकुलामधून अनेक होतकरू खेळाडू निर्माण झाले ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा व राज्याचा नावलौकिक वाढविला. क्रीडा संकुलातून असे महान खेळाडू तयार होत आहेत. या खेळाडूंना या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभले आहे.

विमानतळाशेजारील मेट्रो स्थानकास डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देण्याची अपेक्षा यावेळी प्रभू कुटुंबियांनी व्यक्त केली. त्यांचे कार्य स्मरणात राहावे, यासाठी या मेट्रो स्थानकास प्रभूंचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिसरातील पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विविध क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंना गौरविण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!