
फलटणच्या कमला निंबकर बालभवनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी बोर्ड परीक्षेचे विशेष मार्गदर्शन. ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत सस्ते यांचे सखोल टिप्स.
स्थैर्य, फलटण, दि. १५ फेब्रुवारी : फलटण येथील कमला निंबकर बालभवन येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेचे विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक चंद्रकांत सस्ते यांनी विद्यार्थ्यांना सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
सध्या साखरवाडी हायस्कूल येथे कार्यरत असलेले सस्ते सर यापूर्वी कमला निंबकर बालभवनमध्ये अध्यापन करत होते. विशेष म्हणजे, दरवर्षी बोर्ड परीक्षेपूर्वी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात, ही परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली.
पेपर रचनेपासून उत्तरलेखनापर्यंत सविस्तर मार्गदर्शन
या सत्रात त्यांनी इंग्रजी बोर्ड पेपरची रचना, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, गुणांचे विभाजन याचे सविस्तर विश्लेषण केले.
Reading Skills अंतर्गत उताऱ्यांवरील प्रश्न सोडवताना की-वर्ड ओळखणे, अचूक उत्तर मांडणी व वेळेचे नियोजन यावर त्यांनी भर दिला.
Writing Skills विभागात पत्रलेखन, अहवाल लेखन, संवाद लेखन, ई-मेल लेखन यांसाठी अपेक्षित मांडणी, योग्य शब्दसंपदा व व्याकरणातील अचूकता याचे बारकावे स्पष्ट केले.
Grammar विभागात काळ (Tenses), Active-Passive Voice, Direct-Indirect Speech तसेच वाक्यरचना यावर उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
Literature विभागात धडे व कवितांवरील अपेक्षित प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद व संदर्भासहित कशी लिहावीत, याचे मार्गदर्शन केले. उत्तरपत्रिका स्वच्छ, सुबक आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व त्यांनी विशेष अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला
विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील अडचणी, लेखनातील चुका आणि व्याकरणातील संभ्रम यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. सस्ते सरांनी संयमपूर्वक उत्तरे देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे दरवर्षी विद्यार्थी इंग्रजी विषयात उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे मानद सल्लागार विश्वास जगदाळे यांनी सस्ते सरांचे विशेष स्वागत करून प्रगत शिक्षण संस्थेच्या ४० वर्षपूर्तीनिमित्त प्रकाशित ‘मातीत रुजलेलं आभाळ – गोष्ट प्रगत शिक्षण संस्थेची’ हे पुस्तक व स्मृतिचिन्ह प्रदान केले. कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले यांनी त्यांचा परिचय करून देत आभार मानले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता बोबडे उपस्थित होत्या.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला निश्चितच बळ मिळाले असून इंग्रजी विषयावरील भीती दूर होऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
