महाबळेश्‍वरमध्ये सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, महाबळेश्वर, दि. 30 : महाबळेश्‍वर पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाकिंदा – क्षेत्र महाबळेश्‍वर रोडवर (डचेस रोड)  तांदुळनहीच्या जवळ डिंगली डेल या बंगल्याच्या जवळ टाटा सन्सने नगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले असून ते तत्काळ हटवावे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते शंकर ढेबे यांनी केली आहे. अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून व वारंवार लेखी तक्रार मुख्याधिकारी व तहसीलदार यांना देऊनही प्रशासनाच्यावतीने कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर डिंगली डेल या खासगी बंगल्याच्या बाजूने धनिक मालकाने तारेचे कुंपण नव्याने उभे केले आहे. जे पूर्वी असलेल्या तार कंपाउंड व भिंत कंपाउंडच्या साधारण 5 ते 7 फूट बाहेर अगदी रस्त्याला लागून आहे.

या रस्त्याने महाबळेश्‍वरच्या पॉईंट दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ होत असते. आगोदरच हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अरुंद आहे. या रस्त्यावर होणार्‍या वाहतुकीस नेहमीच वाहतूक अडथळ्याचा सामना करावा लागतो. यातच टाटांनी केलेले हे अतिक्रमण म्हणजे महाबळेश्‍वरकरांच्या अडचणीत भर घालणारे आहे. महाबळेश्‍वरच्या भविष्याच्या दृष्टीने देखील अतिशय अडचणीचे ठरणारे आहे. ही प्रॉपर्टी टाटांच्या ताब्यात असली तरी या प्रॉपर्टीचे मूळ मालक दलाल होते. त्यांच्या कारकिर्दीत दलाल यांनीच हा रस्ता नगरपालिकेस दिल्याचा इतिहास आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीच्या हद्दी दगडी कुंपण करून देवनळीचे वृक्ष लावून कायम केल्याच्या खुणा  अस्तित्वात आहेत. सध्या टाटांनी या हद्दी तोडून बेकायदेशीरपणे मूळ मालकाने सार्वजनिक रस्त्यासाठी सोडलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

डिंगली डेलच्या व्यवस्थापकास भेटून अधिक माहिती घेतली असता त्यांनी ही प्रॉपर्टी टाटांच्या मालकीची असल्याची माहिती दिली आहे.  या प्रॉपर्टीचे नकाशे अथवा मोजणीची कागदपत्रे दाखविण्याची विनंती केल्यावर ते उपलब्ध नसल्याचे समजते. या प्रॉपर्टीमध्ये आरसीसी काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याची देखील  परवानगी नसल्याची बाब समोर आली आहे.

या कंपाउंडचे काम सुरू असताना वृक्षतोड झाल्याची बाब समोर आली आहे. गरिबांना एक न्याय व धनिकांना एक न्याय, असे दुहेरी चित्र महाबळेश्‍वरमध्ये निर्माण झाल्याची चर्चा  आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!