दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
सातारा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे फलटण उपविभागाने कोळकी येथे बांधलेल्या पाझर तलावात अज्ञात व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाची चौकशी करून त्या अतिक्रमणधारकाविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र लघुपाटबंधारे उपविभाग फलटणचे उपविभागीय जलसंधारण अधिकार्यांनी फलटण शहर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, लघु पाटबंधारे विभागामार्फत कोळकी (दंडीले /पत्र्याचा मळा) येथे पाझर तलाव बांधण्यात आला आहे. या तलावात अतिक्रमण केल्याची माहिती कोळकी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पत्राद्वारे लघुपाटबंधारे फलटण उपविभागाला दिली. त्यानुसार पहाणी केली असता या तलावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून जुन्या इमारतीचे अवशेष टाकून तलावाच्या बुडीत क्षेत्रात अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.
या तलावाच्या बाजूने मोठया प्रमाणात नागरी वस्ती वाढत असलेने भविष्यात तलावात अतिक्रमण होवून तलाव नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही व जलसंधारणाचा मूळ हेतू असफल होईल. त्यामुळे फलटण शहर पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी.