सीमा भागात प्रत्येक वर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । कोल्हापूर । आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सीमा भागात महा-रोजगार मेळावा घेण्यात आला. यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व देवचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुननगर येथील (देवचंद कॉलेज) येथे महा-रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी, देवचंद शिक्षण समुहाचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्षा तृप्ती शहा, राहुल पंडित, रविंद्र माने, राजेखान जमादार, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक सदाशिव सुरवसे आदी उपस्थित होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या भागात सुरु करण्याची गरज आहे. सीमा भागासाठी ही योजना सुलभ करण्याचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील उद्योगांना ज्या प्रमाणे प्रोत्साहन देतो, त्याप्रमाणे या भागातील लोकांना दिले जाईल. सीमा भागातील नक्की प्रश्न काय आहेत. हे समजून घेण्यासाठी आगामी काही दिवसांत येथे मेळावा घेवून सीमा बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी  मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शंभुराज देसाई यांना या मेळाव्यासाठी आपण घेवून येवू. त्याचबरोबर सीमा वादावर जे-जे करावे लागेल ते-ते राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण करु, अशा नि:संदिग्ध शब्दात त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

सीमा भागातील युवक-युवतींनी आपल्यातील कौशल्य व शैक्षणिक पात्रता ओळखून त्याप्रमाणे कंपनीची निवड करावी. येथील युवकांनी स्वत:ला एकटे समजू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहील. तसेच ज्या कंपनींनी गरजू उमेदवारांची नियुक्ती केली आहे, अशा उमेदवारांना त्या-त्या कंपन्यांनी सन्मानजनक वेतन द्यावे, अशी अपेक्षाही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी व्यक्त केली.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, सीमा भागातील  युवक-युवतींसाठी प्रथमच रोजगार मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्याला युवक-युवतींनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. ही बाब अभिमानास्पद असून या मेळाव्यातून केवळ नोकरी मागणारेच युवक निर्माण न होता अनेक उद्योजक निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, विद्यार्थ्यांनी ‘हार्डवर्क’ला प्राधान्य द्यावे. स्पर्धात्मक युगात स्वत:ला स्पर्धेसाठी तयार ठेवावे. केवळ नोकरीवरच समाधान न मानता रोजगाराच्या अधिक संधी त्यांनी शोधाव्यात. ज्या उमेदवारांची नियुक्ती झाली नाही अशा उमेदवारांनी निराश होवू नये. आपल्यातील कौशल्य ओळखून त्यांनी स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

सीमा वासियांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी या महा-रोजगार मेळाव्याप्रमाणेच  लवकरात-लवकर मेळावा आयोजित करावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी नोकरीसाठी पात्रता धारण केलेल्या सुमारे 25 युवक-युवतींना नोकरी प्रमाणपत्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध बँकांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत चार वाहनधारक लाभार्थींना वाहनांची चावी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बारा उमेदवारांना कर्ज मंजुरी पत्रे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  देण्यात आली.

या रोजगार मेळाव्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणच्या विविध 92 कंपन्यांनी आपला सहभाग दर्शविला. या मेळाव्याकरिता सुमारे चार हजार उमेदवारांनी आपली नाव नोंदणी केली. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिल कार्यालय (कागल), एमआयडीसी, परिवहन, जिल्हा उद्योग केंद्राचे सतीश शेळके, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राचे संजय माळी यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर माने तर आभार प्रदर्शन शुभम शेळके यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!