सहा महिन्यांपासून पगार रखडल्याने नवले हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि. 30 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असताना डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य विभागाच्या साहाय्याने केंद्र व राज्य सरकार दिवसरात्र झटत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्व वैद्यकीय यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामाची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने त्यांना विमाकवचासह आदी सुविधा उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्याही सर्वतोपरी काळजी घेतली आहे. मात्र याउलट जवळपास ७० ते ८० च्या जवळपास कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या सहा महिन्यांपासून झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि.३०) काम बंद आंदोलन केले.

नऱ्हे येथे नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वॉर्डबॉय, क्लार्क, स्वच्छता कर्मचारी,सुरक्षा रक्षक असे चार हजारापेक्षा जास्त जण येथे काम करतात. पैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार महिन्याला वेळेवर केले जात असून रुग्णालय प्रशासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दिले नाहीत. त्यामुळे जिवंत असताना काम केल्याचा पगार तरी देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली.

 सध्या लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या असून शिवाय दुकानदारांनी त्यांना सध्याच्या परिस्थितीत उधारी देणे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच घर भाडे, इतर अनेक गोष्टींसाठी पैसा नसल्याने हे कर्मचारी संकटात सापडले आहेत. तसेच इतर विभागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीच साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.

समाजकल्याण विभागाकडून तसेच काही विध्यार्थ्यांची फी येणे बाकी असून फी बाबत सरकारने विद्यार्थी व पालकांना आग्रह करू नये असे सांगितल्याने विद्यार्थ्यांना फी मागणे कठीण झाले आहे. मात्र तरीही रुग्णालय प्रशासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे बेसिक वेतन केले असून इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच करण्याच्या नियोजनात आहे. डॉ. शालिनी सरदेसाई, प्रमुख, श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!