
दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । फलटण । येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचारी हे राज्य शासनांमध्ये महामंडळाचे विलीनीकरण व्हावे म्हणून संपावर आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे. अश्यामध्ये फलटणमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेमध्ये रक्त मिळत नाही. हे जाणूनच जैन सोशल ग्रुप (महाराष्ट्र रिजन) व जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटण येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी रक्तदान करून माणुसकी जपली असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध उद्योजक मंगेश दोशी यांनी केलेले आहेत.
जैन सोशल ग्रुप (महाराष्ट्र रिजन) व जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटण येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारातील कर्मचाऱ्यांनी बुधवार दि. ०५ जानेवारी रोजी रक्तदान शिबीर आयोजित केलेले होते. त्यावेळी प्रसिद्ध उद्योजक मंगेश दोशी बोलत होते. यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डाॅ. सुर्यकांत दोशी, सचिव श्रीपाल जैन, माजी अध्यक्ष व फलटण ब्लड बॅकेचे सचिव डाॅ. संतोष गांधी, सहखजिनदार समीर शहा, संचालक डाॅ. मिलिंद दोशी, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, युवा फोरमचे अध्यक्ष सिध्देश शहा, सुखदेव अहिवळे, विवेक शिंदे, सुनिल बोद्रें, ज्ञानेश्वर कदम, दत्ताञय धुमाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सदरील रक्तदान शिबिरास फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, एस. टी. अप्रेटिस संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब ननावरे, भाजपाचे युवा नेते पिंटू इवरे यांनी आवर्जून भेट देऊन रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचे हि स्पष्ट केले.
जैन सोशल ग्रुप व युवा फोरम फलटणच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारातील कर्मचाऱ्यांना सामाजीक बांधिलकी म्हणुन किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले. त्यासोबतच श्रीकृष्ण उद्योग समूहाच्या मार्फत कर्मचाऱ्यांना भाजीपाला किट व किराणा किट देण्याचे बाळासाहेब ननावरे यांनी यावेळी जाहीर केले.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रीपाल जैन, सुखदेव अहिवळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कदम, विश्वजीत कदम, संजय कदम, सतीश जगताप, संतोष चव्हाण, सोनाली पालवे, अश्विनी गोसावी यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.