स्थैर्य, फलटण दि. २४ : फलटण शहरातील डॉ. आंबेडकर चौक ते डेक्कन चौक हा येथील बाजार पेठेचा मुख्य भाग असून याच भागात अनेक बँका असून त्यांनी वाहनतळाची कसलीही सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने या भागातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे, मात्र पोलीस व नगर परिषद प्रशासन त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे.
त्यातच सध्याच्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर येथील स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, आय. डी. बी. आय. या बँकांनी बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना बँक कार्यालयाबाहेर उभे करुन क्रमाक्रमाने आत सोडण्याची व्यवस्था केल्याने या ग्राहकांच्या रांगा रस्त्यावर लागत असल्याने रस्त्यावरील गर्दीत आणखी भर पडत आहे, त्याचबरोबर करोनाच्या पार्श्वभूमीवर येथे सोशल डिस्टनसिंग, मास्क वापरणे, गर्दी टाळणे, कोठेही न थुंकणे या बाबींचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येते,उन्हा पावसाची पर्वा न करता तासन तास रांगेत उभे राहणाऱ्या ग्राहकांकडून या अपेक्षा करणे गैर व अवाजवी ठरत असल्याने पोलीस व नगर परिषद प्रशासन कदाचित या बाबीकडे दुर्लक्ष करीत असावे.
तथापी नगर परिषद कार्यालयालगत, जुन्या मालोजी पार्कचे जागेत आणि डेक्कन चौक येथे असे दोन प्रशस्त वाहनतळ तयार झाले आहेत तेथे वाहने लावण्यासाठी आणि हा संपूर्ण परिसर नो पार्किंग झोन करुन पोलीस व परिषद प्रशासनाने या भागातील बँकांपुढील वाहनांची गर्दी प्रथम टाळावी, दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांसाठी बँक इमारतीत पुरेशी बैठक व्यवस्था करण्यास अथवा या बँकांच्या कामकाजाच्या वेळा वाढवून रस्त्यावरील ग्राहकांची गर्दी टाळण्यास या बँकांना सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे.