निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी – आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.६: कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अजूनही या महामारीची साथ आटोक्यात आलेली नाही. कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या निकषास पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी आणि कोरोनाचे संकट थोपवण्यास हातभार लावावा असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

शासकीय आणि काही खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सातारा शहरातील कस्तुरबा गांधी आरोग्य केंद्रात मोफत लसीकरण सुरु असून या केंद्राला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आज भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, डॉ. दीपक थोरात आदी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला आणि लस घेणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.

यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोरोनापासून दूर राहण्यासाठी लस घेणे काळाची गरज आहे. संपूर्ण लसीकरण झाले तरच कोरोना महामारीला पायबंद घातला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लस घेतली असून लस घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लसीबाबत चुकीचे समज, गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे कोणीही लक्ष न देता लस घ्यावी आणि कोरोनापासून मुक्ती मिळवावी. शासनाच्या निकषामध्ये बसणाऱ्या सर्वच नागरिकांनी लस घ्यावी आणि आपला देश कोरोना मुक्त करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!