स्थैर्य, सातारा, दि. २४ : सातारा जिल्ह्याची ओळख मुळातच वीरांची भूमी अशी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष असो किंवा नाना पाटलांचे पत्री सरकार असो ज्या-ज्या वेळी देशावर संकट आले त्यावेळी सातार्याने आपला मराठी बाणा जपत आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. तीच भावना जपत स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे कणखर आणि खंबीर नेतृत्व सातारा जिल्ह्याने या देशाला दिले. स्वातंत्र्यानंतर या भारतभूमीच्या रक्षणासाठी अनेक ध्येयवेडे शूरवीर जवान या जिल्ह्याने देशाला दिलेत. अशाच एका ध्येयवेड्या मेजरपदी निवड झालेल्या तरुणाची ही कहाणी.
हेळगाव येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातला गणेश जोतीराम पाटील हा मुलगा कौटुंबिक परिस्थिती बेताचीच असतानादेखील अतिशय खडतर परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण करून स्वकष्टावर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी 22 सप्टेंबर 2001 साली हा तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाला. 22 सप्टेंबर 2001, एक ते सहा ऑगस्ट 2014 पर्यंत शिपाई पदापासून ते हवालदारपदापर्यंत त्यांंना बढती मिळाली. हवालदार पदावर असताना त्यानी खात्यांतर्गत स्पेशल कमिशन परीक्षा दिली. दि. 6 ऑगस्ट 2014 रोजी त्याला लेफ्टनंट हे कमिशन मिळाले. त्यानंतर दि. 7 ऑगस्ट 2016 रोजी त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली. दि. 7 ऑगस्ट 2020 रोजी त्यांना सैन्यदलातील मेजर हे प्रमोशन मिळाले आणि त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.ही आनंदाची बातमी गावात समजताच सर्वांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेज, फोन-द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सभासद, तंटामुक्तीचे सर्व सदस्य, गावातील आजी-माजी सैनिक संघटना आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.