दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । खंडाळा । सातारा जिल्ह्यातील राजकीदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या खंडाळा पंचायत समितीची सभापती पदाची निवड आज बुधवार दि.१ डिसेंबर रोजी होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य अश्विनी पवार यांची सभापतीपदी निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, विरोधी गटाकडून जोरदार हालचाली चालू आहेत.
खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरलेल्या सूत्रानुसार सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर सभापती पदासाठी निवडणूक होत आहे. सध्या उपसभापती वंदना धायगुडे-पाटील यांची हंगामी सभापपतीपदी नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद मोटे,राजेंद्र तांबे, अश्विनी पवार हे तीन सदस्य असून काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील व अपक्ष म्हणून चंद्रकांत यादव, शोभा जाधव असे सहा संख्याबळ आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील यांना बरोबर घेत वंदना धायगुडे-पाटील यांना उपसभापतीपद बहाल केले आहे. तर सुरवातीला राष्ट्रवादीचे ठरलेल्या सूत्रानुसार व वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या मान्यतेने पंचायत समिती सदस्य मकरंद मोटे, राजेंद्र तांबे यांना सभापतीपद तर आत्ता पंचायत समिती सदस्य अश्विनी पवार यांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी अपक्ष पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव , शोभा जाधव यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कातंत्र देण्याकरिता सभापतीपदासाठी चमत्कार घडविण्याकरिता जोरदार हालचाली सुरु आहे.
खंडाळा पंचायत समिती सभापतीपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव हे काम पाहणार आहे. दरम्यान, सभापतीपदी अश्विनी पवार यांची निवड हि निश्चित मानली जात असली तरी विरोधकांकडून चमत्कार घडण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.