स्थैर्य, फलटण दि.२९: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवडी विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य, युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून यामध्ये अभिजित पंडीतराव निंबाळकर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अभिजित निंबाळकर हे गेली सहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राजे गट) मध्ये कार्यरत आहेत.कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्व सामान्य मुलगा ते तालुकाध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.! सुरूवातीपासूनच ते विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका संघटक व काही कालावधी नंतर उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढलेला विद्यार्थ्यांचा मोर्चा, विद्यार्थ्यांचे वेळेवर न होणारे प्रवेश, परीक्षेचे निकाल न लागणे, स्कॉलरशिप जमा न होणे, तसेच तत्कालीन भाजप सरकार विरोधात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केलेले आंदोलन, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी भारनियमन बंद व्हावे, एस.टी.बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात, ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी यासारख्या विविध महत्वाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी केलेली आंदोलने लक्षणीय आहेत.
तसेच फलटण मधील पुणेस्थित विद्यार्थ्यांसाठी श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान स्थापनेवेळी सहभाग, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, कोरोना संकटात गोर गरीब, विधवा महिलांना गहू, तांदूळ साखर इ. पदार्थांचे कीट वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिप्राय नोंदणी अभियान यासारख्या सामाजिक व राजकीय उपक्रमांमधून प्रबोधन, मदत करण्यासाठी नेहमी ते अग्रेसर राहिले आहेत.
सदर निवडीनंतर बोलताना अभिजित निंबाळकर यांनी सांगितले की, ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांचे आभार मानून पुढील काळात या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर राहून वेळ प्रसंगी आंदोलने करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच तालुक्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे संघटन करून विविध उपक्रम राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून हे सर्व करत असताना जवळचे सहकारी कै.प्रशांत नाळे यांची पोकळी आपल्याला कायम जाणवेल, असे भावपूर्ण उद्गारही अभिजित निंबाळकर यांनी यावेळी काढले.