निवडणूक आयोगाचा कमलनाथ यांना दणका; स्टार प्रचारकाचा दर्जा केला रद्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 30 : ‘आयटम’ संदर्भातील वादग्रस्त टिप्पणीवरून निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना जोरदार झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत. कमलनाथ यांच्यावर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री इमरती देवी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. डाबरामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेशी राजे यांच्या प्रचार सभेत कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी इमरती देवी यांचा उल्लेख करताना ‘आयटम’ हा शब्द वापरला होता. चहुबाजूंनी टीका झाल्यानंतरही कमलनाथ यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार देताना आपल्या वक्तव्याचे समर्थन केले होते.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशात या शब्दाच्या आणि राजकीय नेत्यांभोवती मोठी चर्चा सुरू असतानाच ज्या स्रीसाठी कमलनाथ यांनी ‘आयटम’ शब्द वापरला होता त्या भाजप नेत्या इमरती देवी यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसला. या व्हिडिओत इमरती देवी कमलनाथ यांच्या आई-बहिणीचा उद्धार करत ‘आयटम’ शब्दाचा वापर करताना दिसल्या होत्या.

यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या ‘चुन्नू-मुन्नू’ टिप्पणीवरही नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाने हे आचारसंहितेचे उल्लंंघन असल्याचे म्हटले होते. विजयवर्गीय यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्याविरुद्ध बोलताना ही टिप्पणी केली होती. यावर निवडणूक आयोगाने विजयवर्गीय यांना समज दिली होती. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या 28 जागांवर येत्या 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!