निवडणूक आयोगाचा मध्यप्रदेशातील भाजप, काँग्रेस नेत्यांना दणका


 

स्थैर्य, भोपाळ, दि.३१: मध्यप्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या दोन मंत्र्यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री मोहन यादव यांच्यावर एका दिवसाची प्रचारबंदी लावण्यात आली आहे. तर मदरशांमधील शिक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळं मंत्री उषा ठाकूर यांना नोटीस पाठवत 48 तासात उत्तर द्यायला सांगितले आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले होते.

मंत्री मोहन यादव यांनी भाजपला वाईट म्हणणां-यांना जमीनीत गाडू, असं वक्तव्य केलं होते. तर, उषा ठाकूर यांनी 20 ऑक्टोबरला इंदौरमधील प्रचारसभेत देशातील सर्वांना सारखं शिक्षण मिळालं पाहिजे, धर्माआधारित शिक्षण कट्टरता आणि विद्वेष पसरवते, असं म्हटलं होते.

निवडणूक आयोगाने मोहन यादव यांना शनिवारी एक दिवस प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यादव यांना कोणत्याही प्रकारची जाहीर सभा, रॅली, रोड शो, मुलाखत, माध्यमांतील कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.

आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचं स्टार प्रचारकांच्या यादीतील नाव हटवलं आहे. त्यामुळे कमलनाथ मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत प्रचार करू शकणार असले तरी त्यांच्या प्रचाराचा खर्च पक्षाला नव्हे तर उमेदवाराला द्यावा लागणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!