दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघ या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघ मध्यवर्ती कार्यालयास भारत निवडणूक आयोग निरीक्षक नूह पी. बावा यांनी भेट दिली.
यावेळी आचारसंहिता, ८५+ मतदारकक्ष, टपाली मतपत्रिका कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, मनुष्यबळ कक्ष, चिन्हांकित मतदार यादी कक्ष, एफएसटी, एसएसटी कक्ष, प्रचार व प्रसिद्धी मीडिया कक्ष अशा विविध पथक कक्षाला भेट देऊन नोडल अधिकारी व पथकप्रमुख यांच्याशी चर्चा व कामकाजाबाबत माहिती घेतली.
स्वीपपथक यांना मतदान जनजागृतीमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. तसेच मतदान जनजागृतीमध्ये स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात सर्व पथकांचे उत्कृष्ट नियोजन केले असल्याचे निरीक्षक नूह पी. बावा सांगितले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक कामकाज यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व टीम काम करत असल्याचे सांगितले.