दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२३ | सातारा |
सातार्यातील शाहूपुरी येथे ‘मॉर्निंग वॉक’ करून घरी परतत असताना दोन तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला बनावट ओळखपत्र दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. यावेळी वृद्ध दाम्पत्याचे सहा तोळ्यांचे दागिने तोतया पोलिसांनी लांबविले. ही घटना शाहूपुरी येथील अर्कशाळेच्या पाठीमागे असलेल्या ठिकाणी दि. १८ रोजी सकाळी ८.०० वाजता घडली.
याबाबतची माहिती अशी, स्मिता सुरेश देशपांडे (वय७१, रा. कोटेश्वर कॉलनी, अर्कशाळेसमोर, शाहूपुरी) आणि त्यांचे पती सुरेश देशपांडे हे दाम्पत्य गुरुवारी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. काही वेळानंतर ते घरी परत निघाले. अर्कशाळेजवळ वाटेत दोघा तरुणांनी त्यांना अडवले. आम्ही पोलिस आहे, असे म्हणून त्यांनी ओळखपत्र दाखविले. आमची पोलीस गाडी पुढे उभी आहे, तुम्ही अंगावर दागिने घालू नका, दागिने घातले तर आमचे पोलिस तुम्हाला दोन हजार रुपये दंड करतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भयभीत झालेल्या स्मिता देशपांडे यांनी त्यांच्या हातातील पाच तोळ्यांच्या सोन्याच्या दोन पाटल्या तसेच एक तोळ्याचे मंगळसूत्र काढून दिले. तो दागिन्यांचा कागद पतीच्या पिशवीत ठेवत असल्याचे दाखविले. मात्र, हातचलाखीने ते दागिने घेऊन दोघे भामटे तेथून पसार झाले.
या घटनेचा अधिक तपास हवालदार लैलेश फडतरे हे करीत आहेत.