सकाळ उजडली ती एक दुदैवी घटना घेऊनच, दि. 19 जुलैची रात्र इरशाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असतांनी निसर्गाने जणू घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाढले गेले.
हे वृत्त कळताच सहदर्यी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे सहा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरुन निघाले.तेथे ते आठ वाजता पोहचेले. परिस्थितीची माहिती घेतली. घटना दुदैवी होती. हे लक्षात आले. त्यांनी लगेच शासकीय आणि निमशासकीय यंत्रणेला कामाला लावले. आणि काही क्षणात मदतीचे हजारो हात उभे राहीले. मदतकार्य जोरात सुरु होते. दुघर्टनाग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन मुख्यमंत्री करत होते. मदतकार्याने वेग घेतला आणि सकाळी 11.30 च्या सुमारात मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथून बाहेर पडला. उपस्थितांना वाटले मुख्यमंत्री मुंबईला परतले म्हणून. परंतु असे सहज परत जातील ते मुख्यमंत्री थोडेच होते. त्यांच्यातला मदतीला धावून जाण्याचा ‘कार्यकर्ता’ या मोठया घटनेतही जागा होता. रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांच्या गाडीतून ते पुन्हा घटनास्थळी रेनकोट घालून आले. गडाच्या खाली उपस्थितांना त्याची कल्पना आली नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा नव्हता आणि अचानक मुख्यमंत्री घटनास्थळाकडे चालू लागले. ते थेट इरशाळवाडीत पोहोचले.
यावाडीपर्यंत पोहोचण्याचा पायमार्ग साधा नव्हता. धड चालताही येत नाही.अशी बिकटवाट धड मातीचा नाही की, दगडांचा. दगड गोटयांमधून येणारे पावसाचे पाणी, समोर भव्य असा कडा. पायवाटेच्या खाली 30 अंशापेक्षा जास्त उताराची तीव्रता. याही अवस्थेत मुख्यमंत्री केवळ दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी चालत होते. आभाळातून जोरदार पाऊस सुरु होता.
घनदाट झाडाझुडपातून वाट काढत दर पंधरा ते वीस मिनिटांनी क्षणभरच थांबत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन बचावकार्याचे ‘सारथ्य’ केले. आभाळातून कोसाळणारा धो-धो पाऊस, खाली निसरडा गाळाने भरलेल्या दगडगोट्यांची वाट, पाय सटकल्यास काय होईल. याची कल्पना असून देखील न डगमगता या ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री सर्व सामान्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी निघाला होता. तब्बल दीड तासाचे अंतर चालून गेल्यावर मुख्यमंत्री पोहोचले त्यांनी प्रत्यक्ष बचावकार्य पाहिले. उपस्थितांना धीर दिला आणि खाली उतरू लागले.
दुर्घटनाग्रस्त जागेवर जाणे जेवढे कठीण होते. त्या जागेवरुन खाली येणे ही मोठी कसरत होती. तरीही मुख्यमंत्री साऱ्या सहकाऱ्यांसोबत दुपारी 4.05 मिनीटांनी खाली आले.
रेनकोट घातलेले ‘कार्यकर्ते मुख्यमंत्री’ तिथे उपस्थित असणाऱ्या साऱ्यांनी पाहीले, आणि सारेच त्यांच्या या अशक्य वाटणाऱ्या घटनेबद्दल चर्चा करू लागले. तब्बल अडीच तासानंतर डोंगरमाथ्यावर प्रत्यक्ष घटना घडलेल्या ठिकाणी राज्याचा प्रमुख असूनही सर्वसामान्यांचा दु:खात धावून जाणारा नेता मुख्यमंत्री श्री. शिंदेच होते. “देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे” या विंदा करंदीकर यांच्या कवितेची आठवण या निमित्ताने होते. स्वत:ला सामान्यांचा कार्यकर्ता म्हणून भाषणात न सांगता त्यांनी आज सर्वांसमोर हे सिध्द केले. आज महाराष्ट्राने मुख्यमंत्री ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री होते, पावसातला ‘योध्दा ’होते, व्यवस्थापनातील ‘तज्ञ ’होते, प्रशासनातील जरब असलेले नेता होते, त्याचबरोबर ‘मानवी संवेदना’ जपणारा एक ‘माणूस’ देखील होते. स्वत:ला नेहमीच सामान्य कार्यकर्ता म्हणून संबोधतात त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.
मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! नैसर्गिक आपत्तीने गेलेला माणूस परत आणता येते नाही, परंतु आहे त्या माणसाला मदतीचा हात देण्यासाठी शासन नेहमीच पुढे असते. हे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस घटनास्थळी थांबून साऱ्या राज्यासमोर दाखवून दिले आहे.