स्थैर्य, फलटण, दि. ०८ : कोरोना वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधीतांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजी जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, तरडगाव, वाठार निंबाळकर, जाधववाडी या आठ गावात दि. ९ ते १५ मे दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केलेले आहे. दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार/व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिलेले आहेत.
संपूर्ण फलटण शहर आणि तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, तरडगाव, वाठार निंबाळकर, जाधववाडी या गावातील प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व नियमांचे काटेकोर पालन आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात करण्यात येणार आहे. कोणीही घराबाहेर न पडता घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.
प्रतिबंधीत क्षेत्रात किराणा, दूध, फळे भाजीपाला घरपोहोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यांच्या अंमलबजावणी साठी फलटण नगर परिषदेने विशेष अधिकाऱ्यांची वॉर्ड निहाय नियुक्ती या पूर्वीच केलेली आहे. त्याच प्रमाणे आता सुद्धा किराणा, दूध, फळे भाजीपाला या वस्तूंचा पुरवठा हा घरपोच करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांनी दिली.
फलटण संपूर्ण शहरात व तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या आठ गावांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण फलटण शहर व कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, तरडगाव, वाठार निंबाळकर, जाधववाडी हि गावे प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केलेली आहेत, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.