भविष्यात ‘एटीपी ५००’ स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । पुणे । श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन यापुढेही महाराष्ट्रातच करण्यात येईल. या स्पर्धेस पुढील पाच वर्षे राज्य शासनाचे आर्थिक सहकार्य असेल आणि भविष्यात एटीपी ५०० स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न  करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रविण दराडे, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर तसेच खेळाडू उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, खेळाच्या विकासाप्रती शासनाची कटिबद्धता आहे. राज्यातील पुण्यासह ९ शहरात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याने सर्वाधिक पदके मिळविली आहेत. शासन प्रत्येक शहरात खेळासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातून चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या काळात राज्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी  मिळेल. आज खेळ सुनियोजित पद्धतीने खेळला जात असल्याने त्यासाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक, शारीरिक क्षमतेची गरज आहे. यादृष्टीने आवश्यक वातावरण आणि सुविधा  खेळाडूंसाठी निर्माण करण्यात येत आहेत. बालेवाडी येथे पहिले क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यातून खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाटा ओपन स्पर्धेचे हे पाचवे पर्व असून गेली चार वर्षे या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी २५० टेनिस स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्यावतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजने जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.

क्रीडा मंत्री गिरीष महाजन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनीही स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.


Back to top button
Don`t copy text!