स्थैर्य, पुणे, दि. २१ : ‘कोरोना’ विषाणूशी सामना करीत विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक विकासाची घडी पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे ऑनलाईन कळ दाबून उद्घाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच अमोल जगताप, विक्रम शेवाळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बाप्पू शेवाळे, आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप घुले, सदस्या अर्चना कामठे, हवेली पंचायत समितीचे सदस्य दिनकर बापू हरपळे, ग्रामसेवक एम.पी.चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सदस्य यांच्यासह समस्त शेवाळेवाडीचे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे कर्मचारी दृकदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’ सारख्या संकट काळात शेवाळेवाडी ग्रामपंचायतीने शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करीत विविध विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला असून ही चांगली बाब आहे. एका बाजूने विकास कामे हाती घेत दुसऱ्या बाजूने ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन, आरोग्य विभाग, आशा वर्कर व ग्रामस्थ यांच्या सामुहिक प्रयत्नाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करुन कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. पाणी गुणवत्ता, शौचालय, घनकचरा, सांडपाणी यांचे व्यवस्थापन, परसबागेसाठी पाण्याचे नियोजन, वृक्ष लागवड, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, जनावरांच्या मलमुत्राचे शास्त्रीय पध्दतीने विसर्जन, नागरिकांना ऑनलाईन करण्यासाठी करण्यात आलेली सुविधा यांसारखी लोकसहभागातून विविध कामे झालेली आहेत. याबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक, दर्जेदार व टिकाऊ स्वरुपाची कामे पूर्ण व्हावीत, विकासाचा गाडा यापुढेही असाच सुरु राहील, अशी आशा व्यक्त करत पुढील कार्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छाही दिल्या.
शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने शापुरजी पालनजी आणि कंपनी यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी, लोकवर्गणी, ग्रामनिधी यांच्यामाध्यमातून दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केले असून यासाठी एकूण २.२५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या रस्त्याला ‘लोकनेते शरदचंद्रजी पवार मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ‘एकात्मिक पाणीपुरवठा’ योजना व ग्रामनिधी यांच्या माध्यमातून तीन लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले असून यासाठी एकूण ३७ लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ‘जनसुविधा योजने’अंतर्गत शेवाळेवाडी- मांजरी बुद्रुक हद्दीलगत असलेल्या स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून या कामासाठी एकूण ५.६० लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.