दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | शिक्षण हे परिवर्तनाचा सर्वात मोठे साधन आहे. शिक्षणामुळेच आर्थिक सामाजिक परिवर्तन शक्य आहे असे उद्गार फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले-पाटील यांनी गुणवरे ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून काढले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, गुणवरे गावचे सरपंच अजित कणसे, उपसरपंच तथा पत्रकार रमेश आढाव, पत्रकार यशवंत खलाटे, पोपटराव मिंड, युवराज पवार, वैभव गावडे, किरण बोळे, हरणेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कळसच्या प्राचार्या संध्या सोरटे, अकलूज प्रादेशिक परिवहन उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजीराव गावडे, ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ईश्वर गावडे, उपअध्यक्ष सौ गिरिजा गावडे ,सचिव सौ साधनाताई गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास गुणवरे व पंचक्रोशी तील ग्रामस्थ तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला पाहिजे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती हे त्यांच्या माता अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजू ओळखून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधावी. भांडण तंटा, रस्ता अडवणे, बांधावरून भांडणे यात न पडता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना प्रगतीची संधी द्या असे पालकांना आवाहन केले.
शाळेचे प्राचार्य गिरीधर गावडे यांनी आपल्या मनोगत मध्ये शाळा राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रयत्नसाठी शाळा व्यवस्थापन, सर्व शिक्षक कसोटीने प्रयत्न करतात असा विश्वास पालकांना दिला.
याप्रसंगी अकलूज प्रादेशिक परिवहन उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजीराव गावडे यांनी संस्थेने शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून NEET, JEE, MH-CET यासारख्या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी साधनाज् अकॅडमीच्या माध्यमातून शाळेमध्ये घेतल्या जात असलेल्या फाउंडेशन व प्री-फाउंडेशन कोर्सची माहिती दिली त्याचबरोबर शाळेने स्वीकारलेला लीड स्कूलचा अभ्यासक्रम, अबॅकस,खेळ, शाळेमध्ये घेतल्या जात असलेल्या इतर ऍक्टिविटीज यासारख्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होईल याची खात्री पालकांना दिली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यामध्ये महाराष्ट्राचे पारंपारिक लावणी, गोंधळ, बालगीत, फ्युजन सॉंग अशा विविध प्रकारच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेली ‘सुभेदार तानाजी’ ही थीम इयत्ता सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. गाण्यादरम्यान विद्यार्थ्यांनी इंग्लिश मधून केलेल्या सूत्रसंचालनाचे पालकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, कलात्मकता पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य गिरिधर गावडे, उपप्राचार्या शितल फडतरे, एडमिनिस्ट्रेटर रमेश सस्ते,नृत्य शिक्षक तेजस फाळके, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी केले तर आभार उपप्राचार्या शितल फडतरे यांनी मानले.