दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | बारामती |
कटफळ (ता. बारामती) येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राखी बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये मोठ्या उत्साहाने विद्यार्थी सहभागी झाले होते.
टाकाऊ पदार्थांपासून राखी कशी तयार करायची, याविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले. वेगवेगळ्या रंगाचे कागद, वेगवेगळे मणी, लोकर, वेगवेगळ्या प्रकारच्या लेस यापासून अतिशय सहजरित्या वेगवेगळ्या आकाराच्या राख्या बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. यामध्ये विविध आकाराची राखी बनवून विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ तसेच विविध प्रकारचे साहित्य वापरून राखी निर्मिती केली. तसेच नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी थाळी सजावट केली. तसेच सदर राख्या बारामती पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांना नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी बांधून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे काम केले.
यावेळी संस्थेच्या सचिव संगीताताई मोकाशी उपस्थित होत्या. कार्यशाळेचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वणवे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.