स्थैर्य, मुंबई दि.२९ : पुर्व मुक्त मार्गास (Eastern Free Way) माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ना. अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलय की, मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली. स्व. देशमुख साहेबांमुळेच हा मार्ग तयार होऊ शकला.
या रस्त्याची लांबी १६.८ कि.मी. असून दक्षिण मुंबईतील ‘पी डीमोलो रोड पासुन ते चेंबुर येथील पुर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडतो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देणं ही त्यांच्या कार्याची पोहच पावती असेल असंही ना. अस्लम शेख यांनी पत्राच्या शेवटी लिहिल आहे.