हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 40 गावांमध्ये भूकंपाचे धक्के, 3.2 रिश्टर स्केलची नोंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, हिंगोली, दि. ३१: हिंगोली जिल्ह्यांमध्ये वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ यातील तालुक्यांमध्ये शनिवारी ता. ३० मध्यरात्री बारा वाजून ४० मिनिटांनी चाळीस गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये वसमत तालुक्यामध्ये तसेच औंढा तालुक्यात मागील काही दिवसापासून भूगर्भातून मोठा आवाज होणे तसेच भूकंपाचे धक्के जाणवण्याची घटना नित्याचीच झाली आहे. मागील तीन ते चार वर्षापासून या तालुक्यात अनेक गावातून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. शनिवारी ता. ३० दुपारी ४ वाजता भूगर्भातून आवाज आला होता. त्यानंतर मध्यरात्री बारा वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. या भूकंपाची ३.२रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. वसमत, कळमनुरी व औंढा तालुक्यातील ४० गावांमध्ये भूकंप झाला आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, चोंढी, पार्डी, कोठारी, डोनवाडा, सुकळी, आंबा, वापटी, कुपटी, गिरगाव, भेंडेगाव, पांगरा बोखारे तर कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, जांब, बोल्डा, येहळेगाव, सुकळी, बोल्डा, पावनमारी, तोंडापूर, बोथी, येडशी तर औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा, पिंपळदरी, सोनवाडी, राजदरी, आमदरी, देवाळा, कुंडकर पिंपरी आदी प्रमुख गावांचा समावेश आहे.

दरम्यान या ठिकाणी कुठेही मोठी हानी झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या भागामध्ये तातडीने पाहणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!