दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
पोलीस ठाण्यामध्ये महिला हरवल्याबाबत अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. इतर कामांपेक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलातर्फे कायमच अग्रक्रम दिला जातो. पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांच्यातर्फे १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘ऑपरेशन मुस्कान’ महिला शोधमोहीम राबवण्यात आली.
सदर आदेशान्वये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना जास्तीत जास्त हरवलेल्या महिलांचा शोध घ्यावा, याबाबत आदेश देण्यात आले.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सस्ते व पोलीस शिपाई टिके व बीट अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने एक महिन्यांमध्ये एकूण दहा महिलांचा शोध लावलेला आहे व सदर महिला सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलेल्या आहेत. यापुढे सुद्धा जुन्या हरवलेल्या महिलांचा शोध घेण्याची मोहीम चालू राहणार आहे.