स्थैर्य, सातारा, दि. ०३ : करोना महामारीने जगाला स्वच्छतेचा महामंत्र तर दिलाच याबरोबर कसे जगावे याचीही शिकवण दिली. चेहर्यावर मास्क लावणे ही काळाची गरज झाली आहे. यामधून ‘टाकाऊपासून टिकाऊ’चा उपयोग झाला आहे. अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेड इन इंडिया’ची घोषणा केली आहे. या महामारीत अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत तर काहींना रोजगार उपलब्ध झाला आहे. पूर्वी गरिबीमुळे शिलाईकाम करून उदरनिर्वाह केला जात होता. त्याचाच उपयोग आता होऊ लागला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याची काळाची गरज असलेले मास्क, नेटेड फॅब्रिक, फ्लोरल प्रिंट, कार्टून प्रिंट, वेडिंग, रेनबो, स्कीन कलर असे नावीन्यपूर्ण मास्क सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शिवणकाम करणार्या महिला व पुरुषांना कपडे शिवताना राहिलेल्या तुकड्यांचा उपयोग विविध प्रकारचे मास्क बनवण्यिासाठी होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील सात हजार बचतगटांनी मास्क निर्मिती केली आहे. पुणे विभागातील 800 पेक्षा जास्त बचतगटांनी मास्क निर्मिती केली आहे तर सातारा जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त बचतगटांनी मास्कची निर्मिती केली आहे.
सुती कापडाच्या मास्क बरोबर आता विवाह सोहळा किंवा इतर कार्यक्रमांसाठी भरजरीचे मास्क तयार केले जात आहेत. मुली व महिलांना सगळं कसं मॅचिंग हवं असतं, त्याप्रमाणे विविध प्रकारच्या ड्रेस व साड्यांवर विविध रंगांचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. मॅचिंगसाठी सिल्कच्या कापडाचा वापर केला जात आहे. विवाह सोहळ्यासाठी पैठणी मास्कची क्रेझ आहे. पैठणीसोबत मॅचिंग मास्कची मागणीही अलीकडे होवू लागली आहे.
विवाह सोहळा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ओटी भरताना मास्कही भेट द्यावा. एरवी ओटीला घातलेल्या कापडाचा काहीही उपयोग होत नसल्याने ते कापड इथं तिथं पडूनच राहते. त्याऐवजी आता भेट म्हणून मास्क दिला तर ती भेट सर्वांनाच आवडेल. विवाह समारंभामध्ये अक्षतांबरोबर गुलाबाचे फूल देण्याची फॅशन होती. आता त्याऐवजी मास्क द्यावा म्हणजे दिलेली वस्तू वापरात तरी येईल.
करोना मुळे अनेक हातांना उद्योग तर मिळालाच आणि टाकाऊ कापडापासून टिकाऊ मास्क तयार करण्याची कलाही दिली.