प्राणीमित्राच्या सतर्कतेने वाचले १५ म्हैशींचे प्राण, दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ३०: कत्तलखान्यात कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या ट्रकमधील १५ म्हशींची प्राणिमित्राच्या सतर्कतेमुळे सुटका झाली.बोरगाव पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून १५ म्हशी व ट्रक असा ९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.प्रतीक आप्पासाहेब ननावरे (खारघर, नवी मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक ननावरे हे सोमवारी सकाळी ग्वाल्हेर-बेंगलोर महामार्गावरून नवी मुंबईकडे जात असताना बोरगाव गावच्या हद्दीत त्यांच्या पुढे असलेल्या ट्रकमधून जनावरे ओरडत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी त्यांनी ट्रक थांबवून याची माहिती सातारा पोलीस कंट्रोल रूमला दिली.

बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी आले.पोलिसांनी ट्रकच्या चालकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अरबाज मुनेर मुल्ला व अमर हाजी शेख (दोघे रा.इचलकरंजी,ता.हाताकलंगे,जि. कोल्हापूर) अशी सांगून ट्रकमधून १५ म्हैशी वडगाव बाजार येथून मोमीन व्यापारी (रा.कमनूर रोड, इचलकरंजी,ता .हातकलंगे, जि. कोल्हापूर) यांच्याकडून घेऊन फलटण येथे कत्तलीसाठी पाठवत असल्याचे सांगितले.त्यांच्याकडे कागदपत्रांची माहिती घेतली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाहीत.ट्रकमध्ये म्हैशी दाटीवाटीने,क्रूरतेने बांधून ठेवली होती.

प्रतीक ननावरे यांनी याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली.पोलिसांनी अरबाज मुनेर मुल्ला व अमर हाजी शेख या दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी म्हैशी वेळे (ता.खंडाळा) येथील गो शाळेत पाठविल्या असून पुढील तपास हवालदार राकेश देवकर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!