दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील जिंती नाका ते खुंटे रोडला रस्त्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपी मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. रस्त्यावरील काही ठिकाणी साईडपट्ट्याच दिसत नव्हत्या. त्यामुळे छोटे मोठे अपघातही होत होते. तर रस्ता अरुंद असल्याकारणाने काही ठिकाणी साईडपट्ट्यांवर वाहने उतरताच काटेरी झुडपांचे फटकारे लागुन फलटण तालुक्यातील नागरिकांच्या लाखो रुपयांच्या वाहनांवर ओरखडे उठुन वाहने खराब होत होती. अशी माहिती फलटण तालुक्यातील नागरिकांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रदिप झणझणे यांचेकडे केली होती.
फलटण तालुक्यातील नागरिकांची सदर समस्या दुर करण्यासाठी फलटण तालुका जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता राजकुमार मठपती यांना समक्ष भेटुन रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाढलेली झाडेझुडपे काढण्याची मागणी केली. त्यानुसार गांभीर्याने मठपती यांनी तेथील शाखा अभियंता काळे यांना जिंती नाका ते खुंटे रस्त्याची पाहणी करण्यासाठी सांगितले. पाहणी केल्यानंतर सदर रस्त्यावरील झाडेझुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढण्याच्या सुचना बांधकाम विभागाकडुन करण्यात आल्या. त्यानुसार बांधकाम विभागाचे कर्मचारी सुरेश पवार यांनी पुढील कार्यवाही केली. जेसीबी व काही ठिकाणी कु-हाडीच्या सहाय्याने झाडेझुडपे काढण्यात आली.
रस्त्याच्या दोन्ही बाजुची झाडेझुडपे काढल्यामुळे खुंटे रस्ता व प्रवासी नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असुन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत फलटण तालुक्यातील नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केल्याचे प्रदिप झणझणे यांनी सांगितले.