स्थैर्य, फलटण, दि.१ : शॉर्ट सर्किटमुळे ऊसाचे पाचट पेटून लागलेल्या आगीत मुंजवडी ता. फलटण येथे ऊस व ठिबक सिंचनचे साहित्य जळाल्याने दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नामदेव नारायण खुरंगे रा. मुंजवडी ता. फलटण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मुंजवडी येथील गट नंबर १०६, १०८, १०९ मध्ये चार एकर ऊसाचे क्षेत्र आहे, सदर क्षेत्रामध्ये ठिबक सिंचनही करण्यात आले होते. शेजारी असलेल्या नामदेव खुरंगे यांनी त्यांच्या ईलेक्ट्रीक पोलवरुन केबल वायर टाकली होती. या वायरीचे जॉइंट उघडे असल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने त्यांच्या क्षेत्रातील ऊसाला आग लागली. या आगीत ऊस व ठिबक सिंचन जळाल्याने वाघमोडे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. दिनांक ३१ आक्टोंबर रोजी पहाटे साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सदर प्रकरणी रोहित पोपटराव वाघमोडे रा. बागेवाडी ( बरड ) ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत.