
दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
‘श्री क्लासेस’ आज नावारूपास आले आहे ते फक्त कठोर परिश्रम आणि ईश्वराची साथ मिळाल्यामुळेच. तसेच चांगल्या लोकांच्या सान्निध्यात आलो आणि पालकांचे आशिर्वाद लाभल्यामुळे ‘श्री क्लासेस’ आज ४५ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. हे मी केले नाही, तर ईश्वराने माझ्याकडून करवून घेतले आहे, असे भावुक उद्गार श्री. शिरीषकुमार किरकिरे सर यांनी काढले.
फलटण शहरात दि. १ ऑगस्ट १९७९ रोजी ‘श्री क्लासेस’ नावाने इंग्रजी विषय शिकविणारा क्लास सुरू झाला. या श्री क्लासेसचा ४५ वा वर्धापनदिन दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी या क्लासचे संस्थापक श्री. शिरीषकुमार किरकिरे सर आपला खडतर जीवन प्रवास सांगताना भावूक झाले होते.
श्री. किरकिरे सर पुढे म्हणाले की, फलटणच्या राजघराण्याची साथ मला मिळाली. तसेच पालकांचे सहकार्य लाभल्याने आज ‘श्री क्लासेस’ इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. हे मी केले नाही, तर माझ्याकडून ईश्वराने करवून घेतले आहे. चांगल्या लोकांच्या सान्निध्यात आल्यास काय घडू शकते, याचे उदाहरण म्हणजे ‘श्री क्लासेस’ आहे. खरे तर बर्याच विद्यार्थ्यांनी मला विचारले की, सर तुम्हाला इंग्रजीमध्ये किती मार्कस् पडत होते; परंतु मी दहावीमध्ये इंग्रजी विषय वगळून पास झालेला विद्यार्थी होतो. नंतर मात्र चांगले गुरू लाभल्याने मी त्यातून बाहेर पडून पास होऊन इंग्रजी विषयाचा क्लास सुरू केला. पुढे कठोर परिश्रम केले व त्याबरोबरच ईश्वराची कृपा माझ्यावर राहिल्याने श्री क्लासेस आज नावलौकीक प्राप्त करून आहे. आज श्री क्लासेसचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत. त्यातील बरेचजण रिटायर्डही झाले आहेत. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट हे केलेच पाहिजेत. त्याबरोबर प्रामाणिकपणा व ईश्वराची साथ हवी. मी एक सूत्र ठेवले होते, ते म्हणजे मी पैशाच्या मागे पळणार नाही, तर पैसा माझ्या मागे पळाला पाहिजे. माणसाला पैसा फार लागत नाही. पैशाकरीता माणसाने कुठलेही काम करू नये. हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्हाला त्या कामाचा आनंद मिळतो. मला विद्यार्थ्यांना शिकविताना जो आनंद मिळतो, त्याची किमतच होऊ शकत नाही. आज इंग्रजीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे चांगले इंग्रजी लिहिता, बोलता तुम्हाला आलेच पाहिजे. मी विद्यार्थ्यांशी नेहमी मित्रासारखा, कधी शिक्षकासारखा वागलो.
या वर्धापदिन समारंभात आजपर्यंत क्लासमधून शिकलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या जाहिरातीचे अनावरण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रा. विक्रम गो. आपटे सर व ज्येष्ठ नागरिक श्री. रंगोपंत दाते यांच्या हस्ते अनावरण झाले.
वर्धापनदिनानिमित्त ‘श्री क्लासेस’ला शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, श्री क्लासेसचे श्री. किरकिरे सर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. इंग्रजी विषय त्यांना किती अवघड वाटत होता, हे त्यांनी आम्हाला सांगितले. परंतु त्यांनी त्या अवघड वाटणार्या गोष्टीवर मात करून आज ते इंग्रजी विषयाचे चांगले शिक्षक आहेत, हे कौतुकास्पद आहे. या यशामागे त्यांची जिद्द आणि कष्ट आहेत. जी गोष्ट आपल्याला जमत नाही, त्यात आपल्याला सुरूवातीला अपयश मिळते, परंतु त्याच्यावर मात करून जिद्दीने आणि कष्टाने ती गोष्ट कशी मिळवायची, हे आज सरांनी आपल्याला सिध्द करून दाखविले आहे. आज सरांचे इंग्रजीवर मोठे प्रभुत्व आहे. खरा हाडामासाचा शिक्षक काय असतो, तर ते किरकिरे सर असतात, हे आज पाहायला मिळत आहे. इंग्रजी भाषा आज जगभरात वापरली जाते. त्यामुळे इंग्रजी भाषा आपली नसली तरी ती चांगली येणे, हे आपल्याला जीवनात यशस्वी करण्यासाठी उपयोगाचे आहे आणि ते काम आज ४४ वर्षांपासून किरकिरे सर करत आहेत.
या कार्यक्रमास श्री क्लासेसचे असंख्य आजी-माजी उच्च पदस्थ विद्यार्थी, पालक व हितचिंतक उपस्थित होते.