दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२४ | फलटण |
शेरेचीवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील वीज वितरण कंपनीच्या डी. पी. च्या चोरीचा प्रयत्न ग्राम सुरक्षा दल व पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे फसल्याची घटना घडली आहे. यावेळी ग्राम सुरक्षा दल व पोलीस घटनास्थळी दाखल होताच चोरांच्या टोळीने अंधाराचा फायदा घेऊन चोरीचे साहित्य घटनास्थळीच सोडून पळ काढला.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शेरेचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा गावात शनिवार, दि. १६ मार्च रोजी मध्यरात्री २.५० वाजता गावातील शेरेचीवाडी-वाठार निंबाळकर सरहद्दीवरील चिंतामणी डी. पी. येथे तीन-चार चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत आणि कटरच्या साह्याने डी. पी. कट करून चोरीचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील श्री. दयानंद नारायण चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (१८००२७०३६००) सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती दिली.
ही माहिती प्राप्त होताच तात्काळ गावकरी तसेच फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची रात्रगस्तीची गाडी दाखल झाली. संपूर्ण गाव सतर्क झाले आणि तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, ग्रामसुरक्षा दल व पोलीस घटनास्थळी दाखल होताच चोर त्यांची एक दुचाकी, एक एलपीजी गॅस सिलिंडरची टाकी, ऑक्सीजन सिलिंडर, कात्री, कटर, शिडी असे सर्व साहित्य जाग्यावरच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व डी. पी. चोरीचा प्रयत्न फसला.
शेरेचीवाडी ग्रामसुरक्षा दलाचे व पोलिसांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.