
स्थैर्य, दुधेबावी, दि. ०५ सप्टेंबर : दुधेबावी, ता. फलटण येथील सुपुत्र आणि सध्या जिल्हा परिषद केंद्रशाळा राजाळे येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत पांडुरंग सोनवलकर यांना सातारा जिल्हा परिषदेचा २०२५-२६ या वर्षाचा प्रतिष्ठित जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला आहे.
शशिकांत सोनवलकर यांनी आपल्या शिक्षक म्हणून कारकिर्दीत अनेक शाळांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. यापूर्वी जिल्हा परिषद शाळा मिरढे येथे त्यांनी विविध शैक्षणिक नवोपक्रम राबवले, तसेच क्रीडा क्षेत्रात शाळेला जिल्ह्याची ‘जनरल चॅम्पियनशिप’ मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. सध्या राजाळे येथील शाळेतही ते सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.
शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते गेली २५ वर्षे ‘संत गाडगेबाबा व्याख्यानमाला’ आयोजित करून समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे करत आहेत. तसेच, ते प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन असून, सध्या संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
हा पुरस्कार जाहीर होताच शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा गायकवाड, चनय्या मठपती, दारासिंग निकाळजे, बन्याबा पारसे, अलका माने, केंद्रप्रमुख बबनराव निकाळजे, मुख्याध्यापिका छाया भोसले यांच्यासह शिक्षक संघटना, शिक्षक बँक व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.