
राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. साताऱ्यातील फलटण, खटावसह सहा तालुक्यांचा यात समावेश असून शेतकऱ्यांसाठी विविध सवलती लागू झाल्या आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ साठी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव आणि माणसह सहा तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि कृषी पंपाच्या वीजबिलात सवलत अशा विविध उपाययोजनांची घोषणा केली आहे.
सातारा जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त
राज्यातील पावसाची तूट आणि पिकांच्या परिस्थितीचा विचार करून कृषी आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर या सहा तालुक्यांमध्ये प्रथम कळ लागू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पीक परिस्थितीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या प्रमुख सवलती
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाकडून विशेष सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती आणि पीक कर्जाचे पुनर्गठन यांचा समावेश आहे. तसेच, कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली असून शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षण आणि पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना
शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, जनावरांसाठी चारा आणि रोजगार हमी योजनेच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.



