
स्थैर्य, सातारा, दि. 30 : सातारा शहरासह परिसरातील भागातील गोळा करण्यात आलेला ओला व सुका कचरा सोनगाव कचरा डेपोत एकत्र करून त्यावर प्रक्रिया केली जाते. उघड्यावर टाकण्यात येणार्या ओल्या कचर्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे हा कचरा कुजण्याची शक्यता जास्त असल्यामुळे निरनिराळे आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेवून औषध फवारणी करावी, अशी मागणी जकातवाडी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नगरपालिकेने या डेपोत येणार्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी डेपो परिसरातच प्रकल्प उभारला आहे. ओला व सुका असे कचर्याचे वर्गीकरण केले जाते. परंतु ओल्या कचर्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. परिणामी परिसरातील सोनगाव, जकातवाडी परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते. शिवाय या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या क रोनासारख्या महामारीमुळे जग वेठीस धरले जात आहे. राज्यासह जिल्ह्यातही करोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत कचरा डेपोमध्ये उत्पत्ती होणार्या डासांमुळे परिसरातील लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाळ्यामुळे परिसरात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या ठिकाणी काम करताना डास अक्षरश: फोडून काढत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पुण्याहून बायोमेडिकलचा कचराही सोनगाव डेपोमध्ये टाकण्यात आला. त्यावर वर्तमान पत्रातून आवाज उठविण्यात आल्यानंतर पालिका प्रशासन जागे झाले. मात्र असे प्रकार वारंवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणार्या संबंधितांवर पालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड जनता खपवून घेणार नाही, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या होत्या. याबाबत सातारा विकास आघाडीतर्फे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
मात्र या कचर्या संदर्भात नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकार्यांनी काय केले? त्या कचर्याचे पुढे काय झाले हे कोणालाही माहीत नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आलेला बायोमेडिकल कचरा व शहरातील कचरा यामुळे होणार्या त्रासला मात्र जकातवाडी, सोनगावसह परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
नगरपालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी औषध फवारणी करून या परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी जकातवाडी व सोनगाव ग्रामस्थांकडून केली जात आहे.